प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची जालन्यात घोषणा

उमेदवारी न दिल्याचे कारण देत नाराज असल्याचे जाहीर करणारे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी जाहीर सभेत केली. भोकरदन येथे विलास औताडे यांच्या प्रचारार्थ  आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. काही जण पक्षात राहून पक्षविरोधी काम करत आहेत. जालन्यात एक भूमिका आणि औरंगाबादमध्ये दुसरी, असे चालणार नाही. सत्तार यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी करत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

जालना लोकसभेची उमेदवारी देताना सत्तार यांना विश्वासात घेतले होते, नव्हे तर त्यांना स्वत:लाही उमेदवारी देऊ केली होती. मात्र, त्यांनी ती स्वीकारली नाही. आता विषय संपला आहे. मी त्यांना पक्षातून काढत आहे, असे चव्हाण यांनी सांगितले. सत्तार यांनी सुभाष झांबड यांना उमेदवारी मिळू नये म्हणून विशेष प्रयत्न केले होते. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला असल्याचेही म्हटले होते. दुसऱ्या दिवशी पक्ष कार्यालयातील खुच्र्या स्वत:च्या मालकीच्या असल्याचे सांगत त्या अन्यत्र नेल्या. त्यामुळे काँग्रेसचे नेते चांगलेच वैतागले होते. नांदेडमध्ये मतदान पार पडल्यानंतर अन्य उमेदवारांच्या प्रचारार्थ बाहेर पडलेल्या अशोक चव्हाण यांनी सत्तार यांच्यावर कारवाई केल्याची घोषणा केली. मात्र, विखेंचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.