News Flash

सुविधांची गाडी चुकलेलीच..

केंद्रात नवीन सरकार येताच पाच वर्षांत रेल्वे प्रवाशांच्या समस्या सुटतील अशी अपेक्षा प्रवाशांना होती.

(संग्रहित छायाचित्र)

गेल्या पाच वर्षांत रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडविण्यात खासदारांनाही अपयश

रेल्वेवरची वाढती गर्दी, उपनगरी गाडय़ांचे कोलमडणारे वेळापत्रक, स्थानकांचा रखडलेला विकास,  अपघात, पाच वर्षांत मार्गी न लागलेल्या प्रकल्पांमुळे मुंबईतील प्रवाशांच्या समस्या कायमच राहिल्याचे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे, पण या साऱ्या समस्या सोडविण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा पिच्छा पुरवून त्या सोडविण्यात खासदारही अपयशी ठरल्याचा सूर प्रवासी संघटनांच्या प्रतिक्रियांमधून उमटला.

केंद्रात नवीन सरकार येताच पाच वर्षांत रेल्वे प्रवाशांच्या समस्या सुटतील अशी अपेक्षा प्रवाशांना होती. मात्र, वर्षांनुवर्षे केल्या जात असलेल्या अपेक्षांची पूर्तता झालेली नाही.

उलट त्या पुरविण्यात खासदारही अपयशी ठरल्याचे मत रेल्वे प्रवासी संघटनांनी व्यक्त केले आहे. रेल्वे प्रशासन व प्रवासी संघटनांशी मुंबई, ठाणे, कल्याणसहित अन्य शहरातील खासदारांनी कधीच समन्वय ठेवला नाही. त्यामुळे समस्या तशाच कायम राहिल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

रेल्वे प्रवासी व रेल्वे प्रशासन यांच्याशी समन्वय ठेवण्यात खासदार अपयशीच ठरले आहेत. सार्वजनिक वाहतूक ही महत्त्वाची आहे आणि हेच खासदारांना अद्याप समजलेले नाही, असे रेल यात्री परिषदेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी सांगितले. रेल्वेचे वेळापत्रक वारंवार कोलमडते. एकच वातानुकूलित उपनगरी गाडी दाखल झाली. आलेल्या वातानुकूलित लोकलचे भाडेही कमी ठेवण्यासाठी खासदारांनी प्रवाशांच्या बाजूने उभे राहणे गरजेचे होते, असे मुंबई रेल प्रवासी संघाचे सरचिटणीस कैलास वर्मा म्हणाले.कल्याण-कसारा-कर्जत प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव म्हणाले, की खासदार रेल्वेकडे फक्त समस्यांबाबत फक्त पत्रव्यवहारच करत बसले.

* अपघात रोखण्यासाठी खासदारांकडूनही पाठपुरावा होणे गरजेचे आहे.

* पश्चिम रेल्वेवर एकच वातानुकूलित लोकल दाखल झाली आहे.

* रेल्वे स्थानकात मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. प्रसाधनगृहांची दुरवस्थाच आहे.

* महिला प्रवाशांच्या सुरक्षेकडेही दुर्लक्ष झाले आहे.

* लोकल वारंवार विलंबाने धावतात.

रेल्वे प्रवाशांच्या समस्या पाच वर्षांत सुटतील असे वाटत होते. परंतु तसे झाले नाही. खासदार अपयशीच ठरले आहेत. पादचारी पूल पडले, गर्दीमुळे अपघात झाले. रेल्वे अपघात होतच राहिले, स्थानकात प्रवाशांना सुविधा मिळाल्या नाहीत.

– समीर झवेरी, सामाजिक कार्यकर्ते

सरकते जिने, उद्वाहने बसवण्यालाच प्राधान्य दिले गेले. मूळ प्रश्नांकडे दुर्लक्षच झाले. ‘एमयूटीपी-२’ची कामे रखडली. खासदारांनी या समस्यांकडे रेल्वेचे लक्ष वेधून ध्यायला हवे होते.

– नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ

आधीच्या सरकारने जे रेल्वे प्रकल्प मंजूर केले होते, ते किमान नव्या सरकारने तरी पूर्ण करणे अपेक्षित होते.  महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न कायम आहे, स्थानकातील प्रसाधनगृहांचीही समस्या सुटलेली नाही.

-लता अरगडे, सरचिटणीस, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2019 1:33 am

Web Title: failure to solve problems of railway passengers in past five years
Next Stories
1 भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाटय़ावर
2 भाजप शेतकऱ्यांविषयी आस्था नसलेला पक्ष
3 शिवसेनेच्या नवरात्रोत्सवात ‘आनंदा’चा धक्का!
Just Now!
X