नाशिक : शिवसेनेचे हेमंत गोडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर भुजबळ, वंचित बहुजन विकास आघाडीचे पवन पवार, अपक्ष अ‍ॅड. माणिक कोकाटे आणि सुधीर देशमुख या नाशिक लोकसभा मतदार संघातील पाच उमेदवारांना आपल्यावरील दाखल गुन्ह्य़ांची माहिती वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांत जाहिरातीद्वारे द्यावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या गुन्हेगारी पाश्र्वभूमीच्या उमेदवारांवरील गुन्ह्य़ांची माहिती तीन वेळा जाहिरातीद्वारे द्यावी लागणार आहे. निवडणूक शाखेने गुन्हे दाखल असणाऱ्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

गेल्यावेळी मतदानावेळी गुन्हेगारांवरील दाखल गुन्ह्य़ांची माहिती केंद्राबाहेर फलकांद्वारे सादर केली गेली होती. यावेळी दाखल गुन्ह्य़ांची माहिती उमेदवारांसह राजकीय पक्षांना तीन जाहिरातीद्वारे द्यावी लागणार असल्याचे यंत्रणेने आधीच स्पष्ट केले आहे. तसेच या जाहिरातीचा खर्च संबंधित उमेदवाराच्या निवडणूक खर्चात समाविष्ट केला जाणार आहे. अर्ज भरतानाच उमेदवारांनी या बाबतची माहिती आयोगाला दिलेली आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघाचा विचार करता प्रमुख तिन्ही राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये संपत्तीबरोबर दाखल गुन्ह्य़ांची जणू स्पर्धा असल्याचे प्रतिज्ञापत्रात उघड झाले होते. बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात कारवाईला तोंड देणारे काँग्रेस-राष्टवादी महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्यावर १५ गुन्हे दाखल आहेत. वंचित बहुजन विकास आघाडीचे पवन पवार यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात १० गुन्हे दाखल आहेत. सेना-भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तसेच गुन्हे दाखल असणाऱ्या उमेदवारांमध्ये अपक्ष अ‍ॅड. माणिक कोकाटे आणि सुधीर देशमुख यांचाही समावेश असल्याचे निवडणूक यंत्रणेने म्हटले आहे.

या पाचही उमेदवारांना वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमात जाहिरातीद्वारे दाखल गुन्ह्य़ांची माहिती द्यावी लागणार असल्याचे उपजिल्हाधिकारी (निवडणूक) अरुण आनंदकर यांनी सांगितले.