मतदानाच्या दिवशी प्रशासनाकडून सुट्टी जाहीर केली जाते किंवा मतदानासाठी कामांच्या वेळांमध्ये सूट दिली जाते. मात्र, तरीही अनेक जण मतदान करण्याबाबत फारसे उत्सुक नसतात. किंबहुना या दिवशीचा सुट्टीचे गैरफायदा घेत लोक बाहेरगावी फिरायला जाणे पसंद करतात. तर काही जण वेळ नसल्याचे सांगत मतदान करणे टाळतात. मात्र, अशा सर्व लोकांना लाजवेल असे काम उद्योजक विजय सप्रे यांनी केले आहे. ते खास ऑस्ट्रेलियातून मतदानासाठी नगरमधील आपल्या गावी परतले आहेत. आज त्यांनी आपला मतदानाचा हक्कही बजावला.

व्यावसायानिमित्त ऑस्ट्रेलियात असणारे सप्रे यांनी लोकसभा मतदानासाठी आवर्जुन वेळ काढत आज आपल्या मूळ गावी मतदानाचा हक्क बजावला. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी मतदान केले. जगात कुठेही असलो तरी मतदानाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रत्येक भारतीयाने मायदेशी परतणे आवश्यक आहे, असे सांगताना याच भावनेने आपणही ऑस्ट्रेलियातील सिडनी येथून आपल्या गावी येऊन मतदान केल्याचे त्यांनी सांगितले.

विजय सप्रे हे सिडनी येथे टेलिकॉमचा व्यावसाय करतात. त्यांना आपल्या राष्ट्रीय कर्तव्याची चांगली जाण आहे आणि म्हणूनच ते मतदान करण्यासाठी ऑस्ट्रेलियातून चक्क ८० हजार रुपये खर्च करुन भारतात आले आहेत.

मतदानासाठी आपण भारतात एकटेच आलो नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ते सांगतात, त्यांच्याप्रमाणेच सिडनीहून भारतात मतदानासाठी ६ जण आले आहेत. इतर लोक हे गुजरातचे रहिवासी आहेत. तसेच आमचे काही मित्रही अमेरिकेतून पुण्यात मतदानासाठी आले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.