संदीप आचार्य

जगातील मोठी लोकशाही असलेल्या देशातील निवडणुकांचे परदेशातील राजकीय अभ्यासकांना कायमच आकर्षण राहिले आहे. यंदाच्या निवडणुकीत जवळपास २५०० विदेशी पर्यटक खास निवडणुकीसाठी आल्याचे पर्यटन क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

लोकसभेच्या २०१४च्या निवडणुकीत ‘मोदी लाट’ होती. देशातील सत्ताबदलाचा प्रयोग बघण्यासाठी त्यावेळी एकटय़ा गुजरातमध्ये १८०० हून अधिक पर्यटक परदेशातून आले होते. निवडणूक पर्यटन अशी थेट संकल्पना आपल्याकडे रुजलेली नसली तरी भारतीय बाजारपेठ आणि कोणता  पक्ष सत्तास्थानी येईल याचा अभ्यास करण्यासाठी राजकीय अभ्यासक तसेच राज्यशास्त्राचे विद्यार्थी येतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील सभेसाठी यंदा जपान, कोरिया व तैवानी पर्यटक उपस्थित असल्याचे ‘केसरी टूर्स’चे व्यवस्थापकीय संचालक शैलेश पाटील यांनी सांगितले. पंतप्रधानांनी भाषणात कोणत्या विषयांना प्राधान्य दिले तसेच लोकभावना काय आहे याची ही मंडळी चौकशी करत होते, असे पाटील यांनी सांगितले.  यंदाच्या निवडणुकीदरम्यान जपान, तैवान, कोरिया तसेच जर्मनी व अमेरिकेतून किमान अडीच हजार लोक आले असून वेगवेगळ्या राज्यांमधील  प्रचारसभा याला त्यांचे प्राधान्य होते.

भारतातील निवडणुका या अनेक देशांसाठी महत्त्वाच्या असून याचा विचार करून आगामी काळात ‘निवडणूक पर्यटन’ असा विचार पर्यटन क्षेत्रातील कंपन्या करू शकतील, असे ‘वीणा वर्ल्ड’च्या प्रमुख वीणा पाटील यांनी सांगितले. ‘मॅब एव्हिएशन’ ही हेलिकॉप्टर व विमाने भाडय़ाने देणाऱ्या कंपनीचे प्रमुख मंदार भारदे यांच्या म्हणण्यानुसार, आगामी काळात लोकसभेच्या निवडणुकांकडे पर्यटन म्हणून निश्चित पाहता येईल.