भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग हा नेहमीच त्याच्या ‘हटके’ ट्विटसाठी चर्चेत असतो. एखाद्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असोत किंवा एखाद्या विषयावर भाष्य करायचे असो, तो नेहमीच कल्पक ट्विट करत साऱ्यांचे लक्ष वेधून घेतो. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे कल हाती आले. त्यानंतर सर्व स्तरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. यात वीरेंद्र सेहवाग याने एक हटके ट्विट करत पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या.

वीरेंद्र सेहवाग याने ट्विट करून मोदींना त्यांच्या या ऐतिहासिक विजयासाठी शुभेच्छा दिल्या. “भारत जिंकला आहे. जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असलेल्या भारतीय जनतेने आपला निर्णय स्पष्टपणे सांगितले आहे. नरेंद्र मोदी जी यांचे या दमदार विजयासाठी यांचे मनःपूर्वक अभिनंदन. मोदी जी, तुमची दुसरी इनिंग अधिक चांगल्या कामगिरीची ठरू दे. भारत अशाच पद्धतीने प्रगती करत राहू दे. आणि नवी गिरिशिखरे पादाक्रांत करू दे. जय हिंद”, असे ट्विट सेहवागने केले आहे. तसेच त्याबरोबर त्याने #विजयीभारत हा हॅशटॅगही ट्विट केला आहे.

५४२ मतदारसंघापैकी दुपारपर्यंत भाजपा तब्बल ३०० मतदारसंघांमध्ये आघाडीवर असून काँग्रेस ५० जागांवर आघाडीवर आहे. डीएमके २३, तृणमूल काँग्रेस २२, वायएसआर काँग्रेस २४ आणि शिवसेना १८ जागांवर आघाडीवर आहे. बहुजन समाज पक्ष ११ आणि बिजू जनता दल १५ जागांवर आघाडीवर आहे. सद्यपरिस्थितीनुसार रालोआ ३४३, यूपीए ८८ आणि अन्य पक्ष १११ जागांवर आघाडीवर असून केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत येणार असे दिसत आहे.