06 December 2019

News Flash

मालमत्ता करमाफीबाबत सेनेकडून फसवणूक

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घोषणा केलेल्या मालमत्ता करमाफीची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही.

मिलिंद देवरा

काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांचा आरोप

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घोषणा केलेल्या मालमत्ता करमाफीची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवर आकारण्यात येणारा मालमत्ता कर निरनिराळ्या १० करांमध्ये विभागण्यात आला आहे. या करांच्या यादीतील सर्वसामान्य कर माफ करण्यात आला असून तो ११ टक्के आहे. उर्वरित ८९ टक्के कर मुंबईकरांना भरावाच लागणार आहे. शिवसेनेने ही मुंबईकरांची फसवणूक केली असून ५०० चौरस फुटांच्या घरात वास्तव्य करणाऱ्या मुंबईकरांनी २०१७-१८ या वर्षांचे मालमत्ता कर भरू नये, असे आवाहन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि दक्षिण मुंबईमधील काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी बुधवारी केले.

पालिका निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी ५०० चौरस फुटांच्या घरात वास्तव्य करणाऱ्या रहिवाशांना मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा केली होती. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमध्ये युती करताना उद्धव ठाकरे यांनी काही अटी ठेवल्या. मुंबईमधील ५०० चौरस फुटांच्या घरांवरील मालमत्ता कर माफ करण्यात यावा या अटीचा त्यात समावेश होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही अट मान्य केली आणि लवकरात लवकर याची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन मुंबईकरांना दिले. राज्य सरकारने मंत्रिमंडळात करमाफीला मंजुरी देत एक अध्यादेश काढला.

मालमत्ता कराच्या देयकामध्ये १० करांचा समावेश आहे. त्यापैकी सर्वसाधारण कर माफ करण्यात आला आहे. ११ टक्के दराने सर्वसाधारण कर वसूल करण्यात येतो. उर्वरित नऊ कर मुंबईकरांना भरावेच लागणार आहेत. त्यामुळे शिवसेना – भाजपने मुंबईकरांची फसवणूक केली आहे, असा आरोप मिलिंद देवरा यांनी बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केला.

First Published on April 18, 2019 1:33 am

Web Title: fraud on property tax says milind deora
Just Now!
X