14 October 2019

News Flash

दुसऱ्यांदा मंत्रिपदामुळे गडकरींकडून अपेक्षा वाढल्या

नागपूरचे खासदार नितीन गडकरी हे पुन्हा केंद्रात मंत्री झाल्याने त्यांच्याकडून नागपूरकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

रखडलेले प्रकल्प मार्गी लागण्याचा विश्वास

नागपूरचे खासदार नितीन गडकरी हे पुन्हा केंद्रात मंत्री झाल्याने त्यांच्याकडून नागपूरकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. दरम्यान, गडकरी यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे पुन्हा एकदा नागपूर देशभरात महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखले जाणार  आहे.

सलग दुसऱ्यांदा नागपूर लोकसभा मतदारसंघातून दोन लाखांहून  अधिक मताधिक्याने विजयी होणारे गडकरी यांचा राजकीय प्रवास अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता ते भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष व त्यानंतर केंद्रीय मंत्री असा राहिला आहे.  राज्यात १९९५ ते १९९९ या काळात युतीची सत्ता आल्यावर प्रथम सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री म्हणून काम करताना त्यांनी त्यांच्या कार्यक्षमतेची चुणूक दाखवली होती. पुणे-मुंबई द्रूतगती मार्गाचे बांधकाम हे त्यांच्याच कार्यकाळातील होते तर नागपुरातील बर्डी उड्डाण पूल गडकरींनीच बांधला होता. त्यानंतर २०१४ मध्ये केंद्रात मंत्री झाल्यावर त्यांनी देशपातळीवर रस्ते, पूल बांधकाम क्षेत्रात कोटय़वधी रुपयांची कामे सुरू करून आपल्या कामाची छाप पाडली.  केंद्रात मंत्री झाल्यावर पाच वर्षांत नागपुरात त्यांनी विकास कामांचा झपाटा लावला. मेट्रो रेल्वे, सिमेंट रस्ते, राष्ट्रीय पातळीवरील शिक्षण संस्था सुरू करून त्यांनी  शहराला पायाभूत सुविधा आणि शिक्षणाच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला.  गडकरींनी गेल्या पाच वर्षांत हाती घेतलेले अनेक प्रकल्प अपूर्ण आहेत. पुन्हा मंत्रीपदामुळे हे प्रकल्प पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

First Published on May 31, 2019 12:56 am

Web Title: gadkari raises expectations from ministers for second time