सुरक्षा धोक्यात आणल्याचा मोदींचा आरोप

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारात  दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना लक्ष्य करणे सुरुच ठेवले आहे. राजीव गांधी हे पंतप्रधान असताना आयएनएस विराट या युद्धनौकेवर त्यांनी कुटुंबियांना सुटीत सहलीला नेले. त्यातून राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणली, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी येथील सभेत केला.

तसेच तेथे आरामात राहण्यासाठी  हेलिकॉप्टरची व्यवस्था करून नौदलाच्या कर्मचाऱ्यांना कुटुंबिय तसेच मित्रांच्या सेवेसाठी जुंपले, अशी टीका मोदींनी  केली. आयएनएस विराटचा वापर सहलीसाठी कुणी केल्याचे तुम्ही ऐकले आहे काय, असा सवाल पंतप्रधानांनी केला.  राजीव गांधी पंतप्रधान असताना असा वापर झाला होता. विशेष म्हणजे  राजीव गांधी यांनी सासरकडील ज्या नातेवाईकांना सहलीला नेले ते इटालियन नागरिक होते असा आरोप मोदींनी केला. परकीय नागरिकांना आयएनएस विराटवर प्रवेश देऊन राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करण्याचा हा प्रकार नव्हता काय, असा सवाल पंतप्रधानांनी केला.

आम आदमी पक्षाने दिल्लीत सरकारचे नाकामपंथी प्रारूप आणले, असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीतील पहिल्याच प्रचारसभेत केला. रामलीला मैदानावरील या सभेत भाजपचे दिल्लीतील सातही उमेदवार उपस्थित होते.