21 October 2019

News Flash

आजोबांच्या पराभवाची नातवाकडून परतफेड

डॉ. सुजय विखे यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी कायम ठेवली, नंतर ती चढत्या क्रमाने वाढतच गेली.

नगर लोकसभा मतदारसंघातील विजय स्पष्ट होताच डॉ. सुजय विखे यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.

मोहनीराज लहाडे

नगर लोकसभा मतदारसंघ निवडणूक

देशभर निर्माण झालेल्या मोदी लाटेला नगर मतदारसंघही अपवाद ठरला नाही. त्यामुळे भाजपने या मतदारसंघात विजयाची हॅटट्रिक साधली. पक्षांतर करुन भाजपची उमेदवारी करण्याचा डॉ. सुजय विखे यांचा निर्णय योग्य ठरला. सुमारे पावणे तीन लाखांच्या मताधिक्याने डॉ. विखे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांच्यावर विजय मिळवला. हे मताधिक्य राज्यात चौथ्या क्रमांकाचे आहे. नगर लोकसभा मतदारसंघातील एकाही विधानसभा मतदारसंघात जगताप यांना मताधिक्य मिळू शकले नाही इतकी वाताहत राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीची झाली. मतदारसंघाबाहेरील असूनही नगरच्या मतदारांनी डॉ. विखे यांना पसंती दिली. राज्याच्या विरोधी पक्षनेत्याच्या मुलालाच पक्षाचा उमेदवार बनवण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खेळी यशस्वी ठरली. नगर मतदारसंघातील आजोबांच्या पराभवाचा वचपा यंदाच्या निवडणुकीत नातवाने काढला. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या झालेल्या या निवडणुकीत डॉ. विखे यांच्या विजयाने, पवार यांचे जिल्ह्य़ावरील वर्चस्व जवळपास संपुष्टात आणले.

डॉ. सुजय विखे यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी कायम ठेवली, नंतर ती चढत्या क्रमाने वाढतच गेली. आ. जगताप प्रतिनिधित्व करत असलेल्या नगर मतदारसंघातही त्यांना आघाडी मिळू शकली नाही. अर्थात जगताप यांची उमेदवारी उशिराने जाहीर झाली असली तरी त्यांनी नेटाने निवडणूक लढवली असे चित्र निर्माण झालेच नाही. अनेक गावात ते पोचूही शकले नाहीत. राजकीय कोंडीने सासरे आ. शिवाजी कर्डिले यांना जावयाला मदतही करता आली नाही. शेवटच्या टप्प्यात तर जगताप यांच्या प्रचाराचा प्रभावही जाणवत नव्हता. काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते प्रचारात होते, मात्र तळाचे कार्यकर्ते-पदाधिकारी मात्र विखे यांचे काम करत होते. ही फाटाफूट मोठी होती. अर्थात त्याला मोदी लाटेचीही जोड मिळाली. मतदारसंघात विखे विरुद्ध पवार अशीच लढत असल्याचे चित्र निर्माण झाले होते, त्याचा फायदा जगताप यांना घेता आला नाही. स्वत: शरद पवार यांनीच आम्ही १९९१ ची पुनरावृत्ती करु, असे वक्तव्य करुन, त्यांच्या मनात विखे-गडाख खटल्याची सल अजूनही कायम आहे, हे दाखवून दिले होते. नगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे तीन आमदार आहेत. नगर शहरात दोन तर श्रीगोंद्यात एक, मात्र तिन्ही ठिकाणी पक्ष पिछाडीवर राहीला.

खरेतर कोपर्डी प्रकरणानंतर निघालेले सकल मराठा समाजाचे मोर्चे व शेतकरी संपाची सुरुवात नगर जिल्ह्य़ातूनच झाली. त्याच मुद्यावरुन राष्ट्रवादी व काँग्रेसने भाजप व मुख्यमंत्र्यांविरुद्ध राज्यभर रान उठवले होते. तोच राष्ट्रवादीच्या प्रचाराचा केंद्रबिंदू होता. मात्र नगरमधीलच मतदारांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. त्याऐवजी सर्जिकल स्ट्राईक आदी मुद्दे मतदारांना अधिक भावले. मतदानापूर्वी शेतकरी व व्यापारी वर्गाच्या नाराजीची अधिक चर्चा होत होती. परंतु मतदानातून ती दिसली नाही. दिसली ती केवळ मोदी लाटच. नवमतदार व महिला यांनीही त्याला पसंती दिली. सहकारी साखर कारखानदारीचा पट्टा असलेल्या मतदारसंघात हा बदल झाला आहे. सलग तीनवेळेच्या विजयामुळे आता हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला समजला जाईल. याचे परिणाम लवकरच होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीतही उमटलेले दिसतील. मतदारसंघात काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्या सोयीसाठी स्थानिक पातळीवर अनेक तडजोडी केल्या. त्यातूनच भाजप बरोबरच शिवसेनेचाही अनेक ठिकाणच्या सत्तास्थानात प्रवेश झालेला आहे. या शिरकावाचे परिणाम अनेक ठिकाणी होताना दिसत आहेत. नगर महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला आ. जगताप व त्यांच्या समर्थक राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केलेली मदत ही त्यातीलच एक अलीकडील घटना. मात्र तरीही उमेदवारीची माळ आ. जगताप यांच्याच गळ्यात घालण्याशिवाय पवार यांनाही पर्याय दिसला नाही. त्यातूनही मतदारसंघात एक वेगळा संदेश गेला. परिणामी ही लढत खरी की केवळ नुरा कुस्ती अशीही चर्चा मतदारसंघात रंगू लागली होती. परंतु त्याला विखे-पवार अशा परंपरागत वादाची झालर मिळाल्याने या तडजोडीच्या घटनेकडे पक्षाने फारसे गांभीर्याने पाहिले नाही. त्याचे पडसाद लोकसभा मतदारसंघाच्या निकालात उमटले. डॉ. सुजय विखे यांनी गेल्या दोन अडीच वर्षांपासून मतदारसंघात उमेदवारीच्या दृष्टीने मोहीम राबवली. कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी करायचीच, अशी त्यांची जिद्द होती. सुरुवातीला काँग्रेस, नंतर राष्ट्रवादीकडे उमेदवारीसाठी विचारणा करुन नंतर ते भाजपमध्ये आले. त्याचा फायदा त्यांना मिळाला. उलट आ. जगताप यांच्यावर उमेदवारी ऐनवेळी पक्षश्रेष्ठींनी लादली. काहीशा अनिच्छेनेच ते निवडणूक लढवत असल्याचे जाणवत होते. हात राखून केलेल्या प्रचाराने त्यांना मोठय़ा मताधिक्याच्या पराभवाकडे ढकलले. उमेदवारीतून घडलेल्या राजकीय घडामोडींनी नगरच्या लढतीकडे राज्याचे लक्ष होते. डॉ. सुजय यांच्या विजयाने आता त्यांचे वडील माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व जि.प. अध्यक्ष शालिनीताई विखे यांचा भाजप प्रवेश अधिक उजळपणे होईल.

नगर मतदारसंघ

अंतिम आकडेवारी

सुजय विखे (भाजप)-  ७ लाख ४ हजार ६६० (५८.५४ टक्के)

संग्राम जगताप (राष्ट्रवादी)- ४ लाख २३ हजार १८६ (३५.१५ टक्के)

निकाल- सुजय विखे  २ लाख ८१ हजार ४७४ मतांनी विजयी

First Published on May 24, 2019 3:02 am

Web Title: grandfathers defeat return grandchildren