पिंपळगाव येथे पंतप्रधानांची सोमवारी सभा

अनिकेत साठे, नाशिक

पिंपळगाव बसवंत येथील पडीक माळरानाच्या सपाटीकरणादरम्यान तीन साप आढळले. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा याच ठिकाणी होत असून त्यावेळी अशी समस्या उद्भवू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मंडपात जमिनीवर कापडी आच्छादन अर्थात ‘मॅट’ टाकण्याचे निश्चित झाले.सभेसाठी तीन लाख चौरस फूट आकाराचा मंडप उभारला जात आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ सोमवारी सकाळी पिंपळगाव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उत्तर महाराष्ट्रातील पहिली जाहीर सभा होत आहे. कांदा, द्राक्षासह कृषिमाल उत्पादित करणारा हा परिसर आहे. कृषी मालाच्या गडगडणाऱ्या दरावरून आजवर जिल्ह्य़ात अनेक आंदोलने झाली. पंतप्रधानांच्या सभेत आंदोलनाला तोंड द्यावे लागू नये म्हणून यंत्रणा चांगलीच खबरदारी घेत आहे. ज्या घटकांनी आंदोलनाचे इशारे दिले किंवा जे घटक आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्याची शक्यता आहे, अशा सर्वाशी आधीच चर्चा करण्याचे प्रशासनाने ठरवले आहे. पंतप्रधानांच्या सभेत कांदा अथवा अन्य कृषिमाल नेण्यास प्रतिबंध घातला जाण्याची शक्यता आहे. काळ्या कपडय़ांसाठी तोच निकष राहू शकतो. सभेत प्रत्येकाने कसे यावे, यासाठी ग्रामीण पोलीस दल खास सूचना देणार आहे.

सभास्थान परिसरातील सापांची. सभा मंडपात जमिनीवर कापडी आच्छादन टाकल्यावर बिळात साप असल्यास तो बाहेर येऊ शकणार नसल्याचे गृहितक आहे. मॅट टाकूनही साप जमिनीवर आलाच तर सर्पमित्र त्याला पकडतील, अशी व्यवस्था केली जात आहे. ही दक्षता घेणे गरजेचे असल्याचा मुद्दा नेचर क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष आनंद बोरा यांनी मांडला.

जमिनीच्या सपाटीकरणावेळी तीन साप आढळले. त्यांना सर्पमित्रांच्या मदतीने पकडण्यात आले. सभेच्या दिवशी दक्षता म्हणून २५ ते ३० सर्पमित्रांना तैनात केले जाणार आहे. तसेच सभेच्या मंडपात जमिनीवर कापडी आच्छादन अर्थात ‘मॅट’ अंथरले जाणार आहे.

– देवीदास पाटील (पोलीस उपअधीक्षक, नाशिक ग्रामीण)