News Flash

VIDEO: मोदींच्या वर्ध्यामधील सभेला अर्ध मैदान रिकामं

राज्यामधील पहिल्याच सभेला जनतेचा थंड प्रतिसाद

स्वावलंबी मैदानातील मोदींच्या सभेतील गर्दी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामधील निवडणूक प्रचाराला वर्ध्यातील सभेमधून सुरुवात केली. आज पंतप्रधानांनी राज्यातील पहिली सभा घेतली. या सभेमध्ये त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून काँग्रेस-राष्ट्रवादीला घेरण्याचा प्रयत्न केला. मोदींनी आज सकाळीच मराठीमध्ये ट्विट करुन या सभेसंदर्भात माहिती दिली होती. असे असले तरी मोदींच्या या सभेला अपेक्षेहून खूपच कमी गर्दी पहायला मिळाली. आयोजकांना अपेक्षित असलेला जनसमुदाय सभेला न दिसल्याने सभेचे बरेसे मैदान रिकामेच दिसत होते.

२०१४ साली झालेल्या निवडणुकीची महाराष्ट्रातील पहिली सभा वर्ध्यातच घेण्यात आली होती. या निवडणुकीमध्ये भाजपाला अभूतपूर्व यश मिळाले. वर्धा भाजपसाठी लकी ठरत असल्याने या वेळी राज्यातील प्रचाराचा शुभारंभ देखील वर्ध्यातच करण्यात आला. आज सकाळी साडे अकरा वाजता वर्ध्यातील स्वावलंबी मैदानात मोदींची या वर्षीच्या निवडणूक प्रचारातील पहिली जाहीर सभा झाली. मात्र १८ एकरच्या या मैदानाचा अर्ध्याहून अधिक भाग रिकामाच होता. मुंबईमधील दादर येथील शिवाजी पार्क मैदानाचा आकार २७ एकर इतका आहे. म्हणजेच शिवाजी पार्क अर्धे भरेल इतकी गर्दीही मोदींच्या पहिल्या सभेला नव्हती. या सभेतील रिकामे मैदानावरुन आयोजकांना अपेक्षित असणारी गर्दी सभेला न आल्याची चर्चा आहे. उन्हाळा आणि सभेच्या ठिकाणी मंडप नसल्याने अनेकांनी सभेकडे पाठ फिरवल्याचीही चर्चा आहे. या आधी २८ मार्च रोजी मोदींनी लोकसभा निवडणुकींसाठीचे रणशींग मेरठ येथील सभेमधून फुंकले त्यासभेतही मागील बाजूला खुर्च्या रिकाम्या असणारे फोटो व्हायरल झाले होते.

या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिंदुत्वाच्या मुद्दावरुन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसने हिंदू दहशतवाद हा शब्द वापरुन देशाचा अपमान केला आहे. हिंदू दहशतवादी कृत्यामध्ये सहभागी असण्याची जगामध्ये एकही घटना नाहीय. हिंदू दहशतवाद हा शब्द आणून काँग्रेसने पाच हजार वर्षापेक्षा जुनी संस्कृती बदनाम करण्याचा प्रयत्न केला असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला. दरम्यान राज्यभरात भाजपा हजार सभा घेणार असल्याचे समजते. यापैकी मोदी राज्यात आठ सभा घेणार असून त्याची सुरुवात आजच्या वर्ध्या येथील सभेपासून झाली.

नक्की वाचा: मोदींची पहिली सभा… पुढे समर्थकांची तर शेवटच्या रांगांमध्ये रिकाम्या खुर्च्यांची गर्दी

मोदींची शेवटची सभा ही मुंबईत होणार आहे. या सभेमध्ये मोदी मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच मंचावरुन भाषण करणार आहेत. राज्यात होणाऱ्या सभांसाठी केंद्रीय मंत्री मंडळामधील सुषमा स्वराज, राजनाथ सिंग, नितीन गडकरी, अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबरोबरच अमित शाह आणि भाजपाचे इतर ज्येष्ठ नेते उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तरी पंतप्रधानांच्या पहिल्याच सभेतील रिकाम्या मैदानामुळे आयोजकांच्या चिंतेत नक्कीच भर पडली आहे. आजच्या सभेला वर्धा लोकसभा मतदारसंघाचे प्रचार संयोजक सुधीर दिवे, अध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, मित्रपक्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेश सराफ व रिपाइंचे जिल्हाध्यक्ष विजय आगलावे उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2019 2:31 pm

Web Title: half empty swawlambi ground at pm modis first rally in wardha maharashtra
Next Stories
1 हिंदू दहशतवाद शब्द वापरुन काँग्रेसने देशाचा अपमान केला – नरेंद्र मोदी
2 अजित पवारांकडून शरद पवार हिट विकेट – नरेंद्र मोदी
3 VIDEO: याला म्हणतात कर्तव्यनिष्ठा… मुसळधार पावसातही तो हवलदार ‘ऑन ड्युटी’ होता
Just Now!
X