19 October 2019

News Flash

डिजिटल गाव हरिसालच्या जाहिरातीत असलेला मॉडेल मनसेच्या मंचावर

आता मुख्यमंत्र्यांकडे यावर काय उत्तर आहे? असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला आहे

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोदींनी जाहीर केलेल्या डिजिटल गावाची पोलखोल केली. या संदर्भातला व्हिडिओ आज राज ठाकरेंनी पुन्हा एकदा सादर केला. या जाहिरातीत मॉडेल म्हणून काम केलेला तरूणच राज ठाकरेंनी मनसेच्या मंचावर आणला. या तरूणाला भाजपावाले शोधत आहेत. त्याला सांगत आहेत झालं-गेलं विसरून जा, परत ये. मात्र हा तरूण आपल्या संपर्कात आला. मी जेव्हा हरिसालची पोलखोल केली त्यानंतर मुख्यमंत्री म्हटले की राज ठाकरे तिथे गेलेच नाहीत. आता हा तरूणच मी तुम्हाला दाखवला आहे तसंच तिथली परिस्थिती काय आहे? ही तुम्हाला पुन्हा एकदा दाखवली. आता मुख्यमंत्र्यांकडे यावर काय उत्तर आहे असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला.

हरिसाल या गावात डिजिटलचा ड ही नाही हे वास्तव राज ठाकरेंनी गुढी पाडवा मेळाव्यात दाखवलं होतं. त्यानंतर या गावासंदर्भातला व्हिडिओच राज ठाकरेंनी सादर केला होता. मनसेच्या कार्यकर्त्यांनी या गावाची पोलखोल केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी हे आरोप फेटाळले. आता पुन्हा एकदा राज ठाकरेंनी तो व्हिडिओ दाखवून डिजिटल गावाची पोलखोल केली आणि तरूणालाच मंचावर आणत भाजपाच्या दाव्यांना धक्का दिला.

राज ठाकरे हरिसालला गेलेच नाहीत असं मुख्यमंत्री म्हणाले.मग ते म्हणाले होते मी महाराष्ट्रात १ लाख वीस हजार विहिरी बांधल्या, कुठल्या विहिरीवर तुम्ही पाणी काढायला गेला होतात? असाही प्रश्न राज ठाकरेंनी विचारला आहे. एवढंच काय तर डिजिटल गावाची जाहिरातही त्या गावात नाही तर भलतीकडेच शूट झाली होती असाही आरोप राज ठाकरेंनी केला आहे. डिजिटल गावाच्या जाहिरातीत मॉडेल असलेला मुलगा नोकरीसाठी पुण्यात वणवण फिरतो आहे असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

First Published on April 15, 2019 8:37 pm

Web Title: harisal advertise model on mns stage now give me the answer says raj thackeray