News Flash

राफेल निर्णय फेरविचार याचिका : सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी  

मंगळवारची सुनावणी पुढे ढकलण्याच्या मुद्दय़ावर खंडपीठाने काहीही भाष्य केले नाही.

(संग्रहित छायाचित्र)

केंद्राची मात्र सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी

सर्वोच्च न्यायालयाने राफेल व्यवहाराबाबत १४ डिसेंबर २०१८ रोजी दिलेल्या निर्णयाच्या फेरविचाराची मागणी करणाऱ्या याचिकांची सुनावणी मंगळवारी होत आहे.

दरम्यान, ही सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केंद्र सरकारने केली होती. या मागणीचे पत्र संबंधित पक्षकारांनाही देण्याची परवानगी न्यायालयाने सोमवारी केंद्र सरकारला दिली. परंतु सुनावणी पुढे ढकलण्याबाबत न्यायालयाने कोणताही निर्णय दिला नाही.

सर्वोच्च न्यायालयाने १४ डिसेंबरच्या निकालात ३६ राफेल विमाने खरेदी व्यवहाराच्या निर्णय प्रक्रियेवर संशय घेण्यास जागा नसल्याचे स्पष्ट करत या व्यवहारात गैरप्रकार घडल्याचा आरोप करीत चौकशीची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळल्या होत्या. परंतु या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी करणाऱ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.

या फेरविचार याचिकांच्या गुणवत्तांबाबत उत्तर दाखल करण्यास आपल्याला आणखी वेळ हवा असल्याचे केंद्राने पत्रात म्हटले आहे. याचिकाकर्त्यांसह इतर पक्षांना हे पत्र देण्याची परवानगी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने केंद्र सरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील आर. बालसुब्रमणियन यांना दिली. तथापि, मंगळवारची सुनावणी पुढे ढकलण्याच्या मुद्दय़ावर खंडपीठाने काहीही भाष्य केले नाही.

माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी आणि विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी दाखल केलेल्या याचिका मंगळवारी दुसऱ्या सत्रात सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोरील सुनावणीच्या यादीत आहेत. आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह आणि अ‍ॅड. विनीत धांडा यांच्या याचिकांवरही मंगळवारीच सुनावणी होणार आहे.

फेरविचार याचिकांमध्ये याचिकाकर्त्यांनी ज्यांचा आधार घेतला आहे, त्या कागदपत्रांबाबतच सरकारने काही प्राथमिक आक्षेप घेतले असून, न्यायालयाने १० एप्रिलला हा मुद्दा निकाली काढला असल्याचे केंद्राने या पत्रात म्हटले आहे. सरकारने या फेरविचार याचिकांच्या गुणवत्तेबाबत उत्तर दाखल केलेले नसल्यामुळे, फेरविचार याचिकांवर सविस्तर उत्तर देण्यासाठी आपल्याला आणखी काही वेळ आवश्यक असल्याचेही सरकारने नमूद केले आहे.

राहुल यांचे नवे दिलगिरी प्रतिज्ञापत्र

‘चौकीदार चोर हैं’ हे आपले वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाच्या तोंडी घातल्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी नवे प्रतिज्ञापत्र सादर केले. आधीच्या उत्तरात त्यांनी प्रचाराच्या नादात आपल्याकडून ती चूक झाल्याचे मान्य करून त्याबाबत खेद व्यक्त केला होता, परंतु स्पष्टपणे माफी मागितली नव्हती. नवीन प्रतिज्ञापत्रातही त्यांनी स्पष्टपणे माफी मागितली नसून संबंधित वक्तव्याबाबत खेद वाटतो एवढेच म्हटले आहे.

मोदी, शहांविरोधातील याचिका आज न्यायालयात

प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा आचारसंहितेचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप काँग्रेसच्या खासदार सुष्मिता देव यांनी याचिकेद्वारे केला असून त्यावर मंगळवारी सुनावणी घेण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले. मोदी आणि शहा आचारसंहितेचा भंग करीत असून निवडणूक आयोग देव यांच्या तक्रारीवर कोणतीही कारवाई करीत नसल्याचे देव यांचे वकील अभिषेक सिंघवी यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 1:49 am

Web Title: hearing today in the supreme court rafael decision referendum petition
Next Stories
1 माउंट एव्हरेस्टवरील कचरा गोळा करून खाली आणण्यास सुरुवात
2 इंडोनेशियातील पुरात ४० जणांचा मृत्यू
3 उत्तर महाराष्ट्रात ६३ टक्के मतदान
Just Now!
X