मक्कल निधी मय्यमचे नेते कमल हासन यांना मद्रास हायकोर्टाच्या मदुराई खंडपीठाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दशतवादी होता, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.


कमल हासन यांचे संपूर्ण भाषण विचारात घेऊन तसेच ते एका नोंदणीकृत राजकीय पक्षाचे नेते असल्याने त्यांचा न्या. बी. पुगालेंधी यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्याचबरोबर पुढील पंधरा दिवसात हासन यांनी करुर येथील कोर्टात हजेरी लावण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत.

हासन यांच्यावर भादंवि कलम १५३ (ए), २९५ (ए) नुसार प्रक्षोभक भाषण करुन जनतेमध्ये जातीय सलोखा बिघडवणारे वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हासन यांनी कोर्टाला सांगितले की, आपण केवळ गोडसेबाबत हे विधान केले होते ते सर्व हिंदूसाठी नव्हते.

चेन्नईतील अर्वाकुरची इथल्या प्रचारावेळी कमल हासन यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर भाषण केले होते. यावेळी ते ‘स्वतंत्र भारतात पहिला दहशतवादी हिंदू. त्याचं नाव नथुराम गोडसे,’ असं म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर काहींनी त्यांना पाठिंबा दिला होता, तर काहींनी मात्र त्यांच्यावर कडाडून टीका केली होती.