नवी निशाणी मतदारांपुढे पोहोचवण्याचे आव्हान

ठाणे : पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना आणि बहुजन विकास आघाडीच्या (बविआ) उमेदवारांमध्ये खरी लढत होणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू असतानाच गेली अनेक वर्षे शिट्टीच्या निशाणीवर निवडणुका लढविणाऱ्या बविआला यंदा मात्र शिट्टी निशाणी मिळणार नाही. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत बविआच्या उमेदवाराला फटका बसण्याची चिन्हे आहेत. तसेच बविआची निशाणी काढून घेण्यामागे शिवसेनेची छुपी खेळी असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

पालघर जिल्ह्य़ात बहुजन विकास आघाडीची मोठी ताकद असून यापूर्वी पालघर मतदारसंघातून बविआचा खासदार निवडून आलेला आहे. गेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये लढत होऊन त्यात भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित हे विजयी झाले होते. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांची पुन्हा युती झाली असून त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात आला आहे. त्यामुळे विद्यमान खासदार गावित यांना पक्षात प्रवेश देऊन शिवसेनेने त्यांना उमेदवारी देऊ केली आहे. त्यामुळे भाजपने मतदारसंघासह उमेदवारही शिवसेनेला दिल्याची चर्चा सुरू आहे. असे असले तरी या मतदारसंघात शिवसेना आणि बविआच्या उमेदवारांमध्ये खरी लढत होणार असल्याचे बोलले जात आहे. असे असतानाच शिट्टी निशाणी गमवावी लागल्याने बविआला मोठा धक्का बसला आहे.

गेली अनेक वर्षे बविआ शिट्टी या निशाणीवर निवडणूक लढवीत असून ही निशाणी बविआची असल्याचा समज मतदारसंघामध्ये आहे. मात्र निवडणूक विभागाकडून लोकसभा निवडणुकीसाठी २९ पक्षांकरिता अधिकृत चिन्हे जाहीर करण्यात आली असून त्यामध्ये बहुजन महापार्टीला शिट्टी ही अधिकृत निशाणी देण्यात आली आहे. त्यामुळे या पक्षासोबत बविआने आघाडी करून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या आघाडीत आता बिघाडी झाली आहे. दरम्यान, बविआसोबत आघाडी करण्याचा निर्णय महाराष्ट्र कमिटीने घेतला होता. मात्र बहुजन महापार्टीच्या अध्यक्षा तसलीमुन्नीसा खान यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांनी आम्हाला कारणे दाखवा नोटीस बजावली. या नोटीसमुळे आमच्यावर पक्षाच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी कारवाई होण्याची शक्यता होती. त्यामुळे आम्ही बविआसोबत आघाडी तोडण्याचा निर्णय घेतला आहे, असे पक्षाचे राष्ट्रीय महासचिव शमशुद्दीन खान यांनी सोमवारी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले. त्यांच्या या निर्णयामुळे बविआला आता शिट्टीविनाच निवडणूक लढवावी लागणार असून त्याचा फटका बविआच्या उमेदवाराला बसण्याची चिन्हे आहेत.

‘शिवसेनेचा संबंध नाही’

बविआची निशाणी काढून घेण्यामागे शिवसेनेची छुपी खेळी असल्याचे बोलले जात असून या संदर्भात बहुजन महापार्टी आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये बैठक झाल्याचेही बोलले जात आहे. या संदर्भात बहुजन महापार्टीचे राष्ट्रीय महासचिव शमशुद्दीन खान यांना विचारणा केली असता, बविआसोबतची आघाडी तोडण्यामागे शिवसेनेचा काहीच संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.