पंतप्रधानपदात आपल्याला रस नाही, विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदीच या पदाचे उमेदवार आहेत आणि यंदाही तेच पंतप्रधान होतील, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी आपली भुमिका स्पष्ट केली. रविवारी भोपाळ येथे एका प्रचार कार्यक्रमादरम्यान माध्यमांशी ते बोलत होते.


यावेळी माध्यम प्रतिनिधींनी त्यांना तुम्ही पंतप्रधानपदाचे उमेदवार आहात का? प्रश्न विचारला त्यावर बोलताना गडकरी म्हणाले, पंतप्रधानपद हा माझा अजेंडा नसल्याचे मी यापूर्वीही अनेकदा स्पष्ट केले आहे. नरेंद्र मोदीच या पदाचे उमेदवार असून तेच पुन्हा पंतप्रधान होतील. २०१४ मध्ये भाजपाने जितक्या जागा जिंकल्या होत्या त्यापेक्षा अधिक जागा भाजपा यावेळी जिंकेल, असा विस्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

गेल्या पाच वर्षात आमच्या पक्षाने महामार्ग, जलमार्ग, कृषी यांसह विविध क्षेत्रात खूप चांगली कामे केली आहेत. त्यामुळे विकास हा आमच्या पक्षाचा निवडणुकीचा मुख्य अजेंडा आहे. हेच आमचं निवडणुकीतील भांडवल असून देशाला सुपर इकॉनॉमिक पॉवर बनवण्याच्या दिशेने आमचे काम सुरु असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

दहशतवाद संपवण्याच्या दृष्टीने भाजपा सरकारने ठोस पावले उचलली आहेत. काँग्रेसने गेल्या पन्नास वर्षात जितकी कामं केली नाहीत तितकी आम्ही गेल्या पाच वर्षात केली, असा दावा करताना मोदींच्या नेतृत्वेने देशाला दिशा देण्याचं महत्वाचे काम केल्याचे गडकरी यावेळी म्हणाले.