पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. मोदी तुम्हाला लोकशाहीची थप्पड मारावीशी वाटते असं वक्तव्य मी केलं होतं. मी तुम्हाला थप्पड मारेन असं कधीही बोलले नव्हते. मी तुम्हाला थप्पड कशाला मारू? तुम्हाला थप्पड मारली तर माझाच हात मोडेल. मग मी कशाला तुम्हाला थप्पड मारू? तुम्ही ५६ इंच छातीचा दावा करणारे पंतप्रधान आहात. तुम्हाला थप्पड मारणं तर सोडूनच द्या साधा स्पर्श करण्याचीही इच्छा नाही असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

मोदींना लोकशाहीची थप्पड मारावीशी वाटते असं वक्तव्य ममता बॅनर्जी यांनी केलं होतं. तृणमूल काँग्रेसवर खंडणीचे पैसे वापरल्याचा हीन आरोप मोदींनी केला आहे. त्यांच्या या आरोपाबद्दल त्यांना लोकशाहीची एक थप्पड मारावीशी वाटते असं बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. मोदी आणि अमित शाह हे दुर्योधन आणि दुःशासनासारखे आहेत. रावण आहेत असाही आरोप बॅनर्जी यांनी केला होता.

यानंतर ममता बॅनर्जी यांना प्रत्युत्तर देताना ममतादीदींनी मला थप्पड मारली तरी मी तो आशीर्वादच समजेन असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं. एवढंच नाही तर चिटफंडच्या नावाखाली गोरगरीबांच्या कमाईवर डल्ला मारणाऱ्या घोटाळेबाजांनाही ममतादीदींनी अशीच थप्पड मारली असती तर बरं झालं असतं. आज ममतादीदींनी इतकं घाबरावं लागलं नसतं, असा चिमटाही त्यांनी काढला होता.

आता या सगळ्यावर भाष्य करताना ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना थप्पडच काय त्यांना स्पर्शही करण्याची इच्छा नाही असं म्हटलं आहे. तुम्हाला थप्पड मारली तर माझाच हात मोडेल असंही ममता बॅनर्जी उपरोधिकपणे म्हटल्या आहेत. तसंच मी तुम्हाला थप्पड मारेन असं कधी बोललेच नाही, तुम्हाला लोकशाहीची थप्पड मारावीशी वाटते असं वक्तव्य मी केलं होतं असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं.