एग्झिट पोल म्हणजे अंतिम निकाल नव्हे हे गंमतीशीरपणे सांगणारे सलमान खान, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या मिम्सचा विवेक ओबेरॉयने फोटो पोस्ट केला होता. या फोटोमुळे विवेक चांगलाच अडचणीत आला आहे. त्यावरून राजकीय नेत्यांसह बॉलिवूड कलाकारांनी टीकास्त्र तर सोडलेच शिवाय राज्य व केंद्रीय महिला आयोगानं नोटीसही पाठवली आहे. यावर प्रतिक्रिया देताना विवेकनं आपलं काही चुकले नसल्याचे सांगितले आहे.

विवेक म्हणतो, ‘ लोक मला माफी मागायला सांगत आहेत. माफी मागण्यात काही अडचण नाही, पण मला सांगा मी काय चुकीचे केलं आहे? जर मी काही चुकीचे केलं असेल तर माफी मागायला तयार आहे. मला वाटत नाही मी काही चुकीचे केलं आहे. एखाद्यानं मिम्स पोस्ट केला आणि त्यावर मी हसलो म्हणजे चूक केली का? ‘

मला माहित नाही लोक याचा मोठा मुद्दा का करत आहेत. एकानं मला मिम्स पाठवले, ते पाहून मला हसायले आले. मी त्यावर खूप हसलो. ज्याने मिम्स पाठवले त्याच्या कल्पनाशक्तीला दाद दिली. जर कोणी तुमची टर उडवत असेल तर तूम्ही ते गांभिर्यानं घेऊ नये.

टीकाकारांना उत्तर देताना विवेक म्हणतो, ‘मिम्समध्ये असणाऱ्यांना काहीही अडचण नाही पण इतरांना आहे. काम करायला जात नाहीत, चुकीच्या मुद्यावर नेतागिरी सुरू करतात. दिदीने(ममता बॅनर्जी) मिम्समुळे एकाला तुरूंगात टाकले. मलाही टाका असे लोक म्हणत आहेत. माझ्या चित्रपटला रोखू शकत नसल्यामुळे काही जण असे करत आहेत.’

महिला आयोगाने पाठवलेल्या नोटीसवर बोलताना विवेक म्हणाला की, ‘नोटीस येण्याची मी वाट पाहत आहे. मला आयोगासमोर माझी बाजू मांडायची आहे. कारण मी काही चुकीचे केले आहे असे मला वाटत नाही.

अभिनेत्री सोनम कपूर अहुजा हिने विवेकच्या या ट्वीटला अतिशय दर्जाहीन म्हटलं आहे. सोनम कपूरच्या या टिप्पणीवर बोलताना विवेक ओबेरॉय म्हणाला, तिने (सोनम कपूरने) तिच्या चित्रपटात थोडी कमी ओव्हरअॅक्टिंग आणि सोशल मीडियावर कमी ओव्हररिअॅक्टिंग (अतिरेकी प्रतिक्रिया देणं) टाळावं. मी स्त्रियांच्या सबलीकरणासाठी गेल्या दहा वर्षांपासून काम करतोय. मी कुणाच्याही भावना दुखावलेल्या नाही.

काय आहे मीममध्ये?
एग्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर विवेकने एका मीमच्या माध्यमातून ऐश्वर्या रायचा भूतकाळ समोर आणला. या मीममध्ये तीन फोटो आहेत. पहिल्या फोटोत ऐश्वर्या राय सलमान खानसोबत असलेला फोटो आहे त्याखाली ओपिनियन पोल असे लिहिले आहे. दुसऱ्या फोटोत विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय असा फोटो आहे. त्या फोटोतएग्झिट पोल असे लिहिले आहे. त्यानंतर अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि अराध्या यांचा फोटो आहे त्याफोटोखाली रिझल्ट असं लिहिलं आहे. हे मीम विवेक ओबेरॉयने तयार केलेले नाही. मात्र ते शेअर करत हे मीम आपल्याला खरोखरच आवडले अशी प्रतिक्रिया दिली आहे. या मीमबरोबर विवेकने हे खूप क्रिएटिव्ह आहे. हे राजकारण नाही, फक्त आयुष्यच समजा, असं त्याने म्हटलं आहे.