पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला हजर रहणार आहेत.  आपल्याला ठाऊक आहेच की लोकसभा निवडणूक जशी जाहीर झाली होती तेव्हापासून आणि खासकरून शेवटच्या टप्प्यांमध्ये ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या होत्या. निकालानंतर भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं. मोदींनी पुन्हा एकदा बहुमत सिद्ध केलं आणि एनडीएने तर ३५० च्या वर जागा मिळवल्या. सगळेच विरोधक मोदींपुढे निष्प्रभ ठरले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीला कोण कोण हजर रहाणार ? याची चर्चाही रंगली होती.  मात्र ममता बॅनर्जी यांनी त्या शपथविधी सोहळ्याला हजर रहाणार असल्याचं म्हटलं आहे. मोदींनी पुन्हा पंतप्रधान होऊ नये असं आपल्याला वाटतं हे स्पष्टपणे मांडणाऱ्या ममता बॅनर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीला हजर रहाणार आहेत.

जिथे भाजपाची सत्ता नाही अशा राज्यातल्या  मुख्यमंत्र्यांशी मी चर्चा केली. ते देखील या शपथविधीला जाणार आहेत असं समजलं, त्यामुळे या शपथविधी सोहळ्याला मी देखील जाणार आहे असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. हा एक औपचारिक कार्यक्रम आहे त्यामुळे त्या कार्यक्रमाला मी हजेरी लावणार आहे असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

 

ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड, पश्चिम बंगालमध्ये पेटलेला हिंसाचार असे अनेक मुद्दे यावेळी निवडणूक प्रचाराच्या वेळी पहाण्यास मिळाले. पश्चिम बंगालमधून भाजपाच्या जागा येतील की नाही? किंवा फार जागा येणार की नाही याबाबत विविध चर्चा रंगल्या होत्या. मात्र पश्चिम बंगालमधून चांगल्या जागा मिळवत भाजपाने मुसंडी मारली. फक्त पश्चिम बंगालच नाही तर देशभरात भाजपाने ३०३ जागा मिळवल्या तर भाजपाप्रणित एनडीए आघाडीने ३५० च्या वर जागा मिळवल्या.

या महाविजयानंतर मोदींचं सर्वच स्तरातून कौतुक होतं आहे. ३० मे रोजी शपथविधी सोहळा रंगणार आहे या सोहळ्याला कोण कोण उपस्थित रहाणार याची चर्चा रंगलेली असतानाच ममता बॅनर्जी यांनी मात्र आपण सोहळ्याला हजर रहाणार आहोत हे स्पष्ट केले आहे.