केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपाने गेल्या पाच वर्षांमध्ये जाहिरातबाजीवर १० हजार ११० कोटी रुपये खर्च केले असा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केला आहे. इतकंच नाही तर देशात आणि राज्यात कसलंही वारं असलं तरीही बारामतीतून पवारच येणार असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. जाहिरातबाजीवर जे पैसे भाजपाने उधळलले ते जनतेच्या हितासाठी वापरले असते तर बरं झालं असतं असंही त्या म्हटल्या आहेत.

बारामती तालुक्यात असलेल्या वाणेवाडी, वडगाव निंबाळकर, माळेगाव या गावांमध्ये सुप्रिया सुळेंचा दौरा होता. गाव भेट दौऱ्या दरम्यान बोलत असताना त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली तसेच बारामतीत पवारच निवडून येणार असा विश्वासही व्यक्त केला. बारामती लोकसभा मतदारसंघातून त्या स्वतः उभ्या आहेत. बारामतीची जागा जिंकणं भाजपाने प्रतिष्ठेचं केलं आहे.

मात्र इतिहास हेच सांगतो की या ठिकाणी पवार घराणंच जिंकत आलं आहे. आज बोलताना सुप्रिया सुळे यांनीही हाच विश्वास व्यक्त केला. एवढंच नाही तर मोदी सरकारने जाहिरातबाजीवर जे पैसे खर्च केले त्यापेक्षा जनतेच्या कल्याणासाठी केले असते तर फार बरं झालं असतं असंही त्या म्हटल्या. अशा प्रकारच्या उधळपट्टीला आळा घालण्यासाठी नवीन लोकसभेत विधेयक मांडणार आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर आजपर्यंत कोणाचाही हवा आली तरीही बारामतीत पवारांचीच हवा असते असं सांगत बारामतीत झालेला विकास दिसत नसेल तर त्यांच्या डोळ्यावर मोफत उपचार करून त्यांना विकास दाखवू असाही टोला सुप्रिया सुळेंनी लगावला.