लोकसभा निवडणुकीच्या या रणसंग्रामात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशभरात प्रचार सभा घेण्यात व्यस्त आहेत. आपल्या सरकारे केलेल्या कामांची माहिती ते जनतेसमोर ठेवत आहेत. रविवारी त्यांची गुजरातमधील पाटन येथे सभा झाली. यावेळी त्यांनी सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइकचा उल्लेख केला. दरम्यान, पाकिस्तानने जर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना भारताकडे सोपवले नसते तर ती ‘काळरात्र’ ठरली असती असे त्यांनी म्हटले आहे. मोदींच्या या विधानानंतर सभेतील लोकांनी मोदी-मोदीच्या घोषणांनी सभास्थान दणाणून सोडले.

यावेळी मोदींनी जनतेला आवाहन केले की, माझ्या गृहराज्यात लोकांचे कर्तव्य आहे की, त्यांनी आपल्या भुमिपुत्राची काळजी घ्यावी. गुजरातमध्ये सर्व २६ जागा मला द्या, असे आवाहन त्यांनी केले. माझे सरकार सत्तेत पुन्हा येईल मात्र, जर गुजरातने भाजपाला २६ जागा दिल्या नाहीत तर २३ मेला टीव्हीवर चर्चा होईल की असं का झालं. मी निश्चय केला आहे की, एकतर मी जिवंत राहिल किंवा दहशतवादी जिवंत राहतील.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसवरही मोदींनी टीका केली ते म्हणाले, शरद पवार म्हणतात मला माहिती नाही मोदी काय करतील. जर त्यांनाच माहिती नाही की मोदी उद्या काय करतील तर इम्रान खान यांना कसं माहिती असेल? यावेळी कुंभमेळ्याचा उल्लेख करताना ते म्हणाले, कुंभमेळ्यातील सफाईची अमेरिकेतही चर्चा झाली होती, त्यानंतर मी तिथे गेलो आणि या सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुतले.