भोपाळमधील भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या ‘रोड शो’ दरम्यान भाजपा कार्यकर्त्यांनी दोन युवकांना मारहाण केली. हे दोन युवक काळे झेंडे दाखवत होते. पोलिसांनी काळे झेंडे दाखवणाऱ्या दोन्ही युवकांना ताब्यात घेतले आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर उमेदवारी जाहीर झाल्यापासून आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. आधी त्यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले. आज तकने हे वृत्त दिले आहे.

चौफेर टीका झाल्यानंतर त्यांनी आपले विधान मागे घेऊन माफी मागितली. नंतर साध्वी प्रज्ञासिंह यांनी बाबरी मशिदीसंबंधी विधान केले. या प्रकरणी त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाला आहे. बाबरी मशीद पाडली त्यावेळी मी सुद्धा त्यामध्ये सहभागी होते. बाबरी मशीद पाडल्याचा मला अभिमान आहे असे विधान साध्वी प्रज्ञा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले. एकूणच साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. कालच साध्वी प्रज्ञा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

काय म्हणाल्या होत्या साध्वी प्रज्ञा
गुरुवारी एका कार्यक्रमात बोलताना साध्वी प्रज्ञा यांनी दिवंगत एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. हेमंत करकरे यांनी मला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप त्यांनी केला. “तो तपास अधिकारी सुरक्षा आयोगाचा सदस्य होता. त्याने हेमंत करकरे यांना बोलावले आणि सांगितले की पुरावे नसतानाही साध्वीला तुरुंगात का डांबले. यावर हेमंत करकरे यांनी सांगितले की, मी काहीही करेन, पण साध्वीविरोधात पुरावे सादर करणारच, मी साध्वीला सोडणार नाही”, असा आरोप साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केला.

हेमंत करकरे याने हा देशद्रोह केला होता. तो मला विचारायचा की खरं जाणून घेण्यासाठी मला देवाकडे जावं लागेल का. यावर मी म्हटलं की तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही जाऊ शकता. मी करकरे यांना सांगितले की तुमचा सर्वनाश होईल. त्याने मला शिवीगाळ केली होती. ज्या दिवशी मी तुरुंगात गेले त्या दिवशी सुतक सुरु झाले आणि ज्या दिवशी दहशतवाद्यांनी करकरे यांना मारले त्या दिवशी सुतक संपले, असे वादग्रस्त विधान साध्वींनी केले होते.