लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पश्चिम उत्तर प्रदेशातल्या आठ जागांवर मतदान होत आहे. २०१४ च्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला पाच नव्या फॅक्टरचा सामना करावा लागणार आहे.

– २०१४ लोकसभा निवडणुकीच्यावेळी पश्चिम उत्तर प्रदेशात जातीयवादी वातावरण होते. सप्टेंबर २०१३ मध्ये मुझफ्फरनगरमध्ये झालेल्या दंगलीनंतर सहा महिन्यांनी येथे निवडणूक पार पडली होती. ६० जणांचा या दंगलीमध्ये मृत्यू झाला होता. हजारो लोक बेघर झाले होते. दंगलीमुळे या भागातील सामाजिक सलोखा बिघडला होता. मुस्लिम, जाट, जाटव आणि गुज्जर असे विभाजन झाले होते.

– यावेळी सध्या तरी जातीय आधारावर विभाजन दिसलेले नाही. आरएलडीचे प्रमुख नेते अजित सिंह आणि त्यांचा मुलगा जयंत यांनी ‘सदभावना यात्रे’ अतंर्गत जाट आणि मुस्लिम या त्यांच्या परंपरागत मतदारांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे.

– त्यावेळी पश्चिम उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांच्या सरकारविरोधात लाट होती. त्याचा भाजपाला फायदा झाला होता. पण यावेळी भाजपाला प्रस्थापित सरकारविरोधातील लाटेचा सामना करावा लागत आहे. केंद्रात आणि उत्तर प्रदेशात दोन्ही ठिकाणी पूर्णबहुमताचे भाजपा सरकार आहे. यावेळच्या निवडणुकीतच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, बुलंदशहरात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची झालेली हत्या हे मुद्दे भाजपाच्या विरोधात जाऊ शकतात.

– यंदाच्या निवडणुकीत एकत्र झालेले विरोधी पक्ष हे भाजपासमोरील मुख्य आव्हान आहे. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्ष विखुरलेले होते. ज्याचा भाजपाला फायदा झाला होता. यंदा समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी आणि अजित सिंह यांचा आरएलडी एकत्र निवडणूक लढवत आहे. मुस्लिम, यादव आणि दलितांचे एकगठ्ठा मतदान या आघाडीकडे वळू शकते. ज्याचा भाजपाला फटका बसू शकतो.

– २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने नव्या चेहऱ्यांना प्राधान्य दिले होते. पण यावेळी प्रस्थापित सरकारविरोधातील लाटेचा सामना करावा लागेल. चार एप्रिलला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची बुलंदशहर येथे सभा झाली. त्यावेळी योगींसमोर भोला सिंह या उमेदवाराविरोधात भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. पंतप्रधान मोदींना निवडण्याची ही निवडणूक असल्याचे सांगून योगींनी परिस्थिती नियंत्रणात आणली.