निवडणुका जिंकण्यासाठी भाजपा दंगली घडवत आली आहे, आजपर्यंतचा त्यांचा तसा इतिहासच आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये घडलेला हिंसाचार हा भाजपाप्रेरीत असल्याचे वेगवेगळ्या पुराव्यांवरून स्पष्ट होत आहे, भाजपावर असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.
पराभव समोर दिसत असल्याने भाजपा मुद्दाम आणीबाणीसदृश्य परिस्थिती निर्माण करत आहे. येत्या काळात भाजपाने औपचारिक आणीबाणी जाहीर केली तर आश्चर्य वाटायला नको.#WestBengalClashes #WestBengal
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) May 16, 2019
पश्चिम बंगालमधील या घडामोडींवर ट्वीट करीत पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपाच हिंसाचार घडवून आणत आहे. पराभव समोर दिसत असल्याने भाजपा मुद्दाम आणीबाणीसदृश्य परिस्थिती निर्माण करीत असल्याचेही पाटील यांनी म्हटले आहे.
अशा प्रकारे हिंसाचार घडवून सत्ताधारी भाजपा काय सिद्ध करीत आहे. पंडीत विद्यासागर यांच्या पुतळ्याची विटंबना भाजपा कार्यकर्त्यांनीच केल्याचा व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत असल्याचा दावाही जयंत पाटील यांनी केला आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या रोड शो पूर्वी तृणमुलच्या कार्यकर्त्यांनी मोदी-शाह यांचे पोस्टर्स आणि भाजपाचे झेंडे उखडून टाकले होते. त्यानंतर संध्याकाळी प्रत्यक्ष रोड शोला सुरुवात झाली त्यावेळी भाजपा आणि तृणमुलच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी धुमश्चक्री झाली होती. यावेळी विद्यासागर कॉलेजमध्ये थोर समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली होती. मात्र, ही तोडफोडप्रकरणी भाजपा आणि तृणमुलच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवरच आरोप केले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 16, 2019 3:27 pm