राजकीय षड्यंत्राचा आरोप, निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार

चंद्रपूर : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांच्या निर्माणाधीन बंगल्यावर आयकर विभागाच्या पथकाने आज बुधवारी छापा टाकला, परंतु दीड तासाच्या या कारवाईत पथकाला काहीच संशयास्पद सापडले नाही. दरम्यान, ही कारवाई राजकीय षड्यंत्राचा भाग असून भाजप उमेदवार हंसराज अहीर यांचा पराभव स्पष्ट दिसत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दबावतंत्राचा वापर करून हे घृणास्पद कृत्य घडवून आणले, असा आरोप काँग्रेसचे विधिमंडळ उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

बुधवारी दुपारी एकच्या सुमारास धानोरकर यांच्या सिव्हिल लाईन येथील निर्माणाधीन बंगल्यावर आयकर विभागाचे आठ अधिकारी व पोलिसांचा ४० जणांचा ताफा धडकला. यावेळी धानोरकर यांचे काही कार्यकर्ते तेथे विश्राम करीत होते. आयकर विभागाच्या पथकाने बंगल्याची पूर्ण तपासणी केली. त्यानंतर काहीही मिळाले नाही असे सांगून पथक निघून गेले. हे पथक नागपूरचे असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एका तक्रारीवरूनच हा छापा मारण्यात आल्याचेही सांगण्यात आले. याप्रकरणी जिल्हा प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारणा केली असता, आयकर विभागाने छापा मारला, परंतु त्यात काहीही मिळाले नाही, अशी माहिती त्याने दिली.  दरम्यान,  निवडणूक आयोगाच्या परवानगीशिवाय हा छापा मारण्यात आला. या प्रकरणाची तक्रार केंद्रीय तथा राज्य निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचे वडेट्टीवार यांनी पत्रपरिषदेत सांगितले, तर धानोरकर यांनीही हे सुडाचे राजकारण असल्याचे सांगत निवडणुकीच्या रिंगणात १३ उमेदवार असताना छापा केवळ माझ्यावरच का, असा प्रश्न उपस्थित केला.

धाडीशी  माझा संबंध नाही – अहीर

पोलिसांच्या धाडीशी माझा तिळमात्र संबंध नाही. कुठल्याही विभागाची कारवाई ही त्या विभागाचा स्वतंत्र निर्णय असतो. खरे तर भारतीय जनता पक्षाची अशी संस्कृती नाही आणि माझेही असे संस्कार नाहीत.  येथील जनता मला जाणते. हा केवळ सहानुभूती मिळविण्यासाठी विरोधकांचा निराधार आरोप आहे, असे स्पष्टीकरण भाजप उमेदवार हंसराज अहीर यांनी दिले आहे.