पुणे : परदेशात वास्तव्यास असलेल्या भारतीयांना बुद्धिमत्तेमुळे सन्मान आहे. पण, समर्थ भारत घडविण्याचा संकल्प घेतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामगिरीमुळे परदेशातील भारतीयांची पत उंचावली आहे. भारताचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आम्ही केवळ मतदान करण्याच्या उद्देशातून पुण्यात आलो.. नोकरीनिमित्ताने आखाती देशात वास्तव्यास असलेल्या आणि केवळ मतदानासाठी पुण्यात आलेल्या संदेश उभे आणि योगेश आठलेकर यांनी मंगळवारी असे मनोगत व्यक्त केले.

पुण्यात बालपण गेलेले संदेश उभे गेल्या २५ वर्षांपासून संयुक्त अरब अमिराती येथील अबुधाबी येथे वास्तव्यास आहेत. अनॉक (अबुधाबी नॅशनल ऑईल) कंपनीमध्ये ते मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. तर, कोथरूड येथील वुडलँड सोसायटी भागातील स्वरूप पार्क येथे वास्तव्यास असलेल्या आठलेकर कुटुंबातील योगेश आठलेकर गेल्या दोन दशकांपासून कुवेत येथील रिझायत ग्रुपमध्ये विक्री विभागाचे वरिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहेत.

लोकशाहीने दिलेला मतदानाचा हक्क बजावण्याबरोबरच समर्थ भारताच्या घडणीमध्ये आपला खारीचा वाटा असावा या कर्तव्यपूर्तीच्या भावनेतून केवळ मतदान करण्यासाठी हे दोघेही सपत्नीक पुण्यात आले. मंगळवारी सकाळीच मतदान करून या दोघांनीही कुटुंबीयांचा निरोप घेऊन परदेशी जाण्यासाठी पुणे सोडले. केवळ आम्हीच नाही तर अबुधाबी येथून ७५ कुटुंबीय मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी भारतामध्ये आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

अबुधाबी येथील महाराष्ट्र मंडळाचे ८०० मराठी कुटुंबीय सदस्य आहेत. तेथे आम्ही नुकताच हनुमान जयंतीचा उत्सव साजरा केला आणि मतदान करण्यासाठी दुसऱ्याच दिवशी पुण्याचे विमान गाठले, असे संदेश उभे यांनी सांगितले. समर्थ भारतासाठी नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेवर यावेत या इच्छेतून मी आणि पत्नी अरुणा, आम्ही मतदान केले.

लक्ष्यभेद आणि पुलवामा प्रकरणानंतर कुरापतखोर पाकिस्तानला शिकविलेला धडा यामुळे परदेशात वास्तव्यास असलेल्या भारतीयांची पत उंचावली आहे. केवळ आखाती देशच नव्हे तर युरोप आणि मध्य आशियाई देशात राहणाऱ्या भारतीयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे, असे योगेश आठलेकर यांनी सांगितले. मी आणि पत्नी मृण्मयी, आम्ही कोथरूड येथील गांधी भवन केंद्रामध्ये मतदानाचा हक्क बजावला. आम्ही मतदानासाठी आलो असलो तरी दहावीत शिकणारी आणि चौथीत असलेली अशा दोघी मुली आमचा मित्र विश्वजित दुबल याच्याकडे आहेत.

विश्वजित मुंबईचा असून त्याला मतदानासाठी सोमवारी (२९ एप्रिल) भारतात यायचे आहे. त्यामुळे मतदान करून लगेचच आम्हाला कुवेतला परत जायचे आहे. तो कुवेतला येईपर्यंत त्याची मुले आमच्याकडे वास्तव्यास असतील, असेही आठलेकर यांनी सांगितले.