बुधवारी प्रचारसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीव गांधींनी भारतीय नौदलाच्या विराट या युद्धनौकेचा वापर खासगी वाहनासारखा केल्याचा आरोप केला होता. लक्षद्वीपमधल्या बेटावर दहा दिवसांच्या कौटुंबिक सहलीसाठी ही विमानवाहू नौका वापरली व यामध्ये इटलीमधून आलेल्या सोनिया गांधी यांच्या नातेवाईकांचाही यात समावेश होता असा आरोप मोदींनी केला होता.

त्यावेळी इंडियन एक्स्प्रेसने राजीव गांधी यांच्या या दौऱ्यासंदर्भात अनेक बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या व त्यांच्या या सहलीचं साद्यंत वर्णन केलं होतं. त्यावेळी प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमधला सारांश…

डिसेंबर १६, १९८७

पी रमण, नवी दिल्ली

गेल्या वर्षी डिसेंबरअखेरीस राजीव गांधींनी आपली मित्रमंडळी व सोनिया गांधींचे कुटुंबीय यांच्या समवेत अंदमानमध्ये सुट्टी साजरी केली होती. यंदाच्या वर्षी त्यासाठी राजीव गांधी यांनी लक्षद्वीपमधल्या एका निर्मनुष्य बेटाची निवड केली आहे. सुरक्षारक्षक, कंत्राटदार व काँग्रेसचे नेते पंतप्रधानांच्या या सहलीसाठी विशेष मेहनत घेत आहेत… सध्याच्या कार्यक्रमानुसार पंतप्रधान व त्यांच्यासोबतचे पाहुणे ख्रिसमसनंतर एक आठवडा येथे व्यतित करणार आहेत.

पंतप्रधानांच्या सहलीची पहिल्या पानावरील बातमी

 

अभियंते आणि कामगार हेलीपॅड, तात्पुरती निवासयोजना आदी उभारण्यात मग्न आहेत. नारळ व मासे वगळता बाकी प्रत्येक गोष्ट मुख्यभूमीवरून म्हणजे २०० ते ४०० किलोमीटरवरून आणावी लागत आहे, ज्याद्वारे आधुनिक सोयीसवलती देता येतील. या सगळ्या गोष्टी हवाई मार्गाने आणण्यात येत आहेत. यामध्ये आचारी, पाणी, जनरेटर्स आणि सुरक्षारक्षक व अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

डिसेंबर २८, १९८७

सामान्यांसाठी बेटांवर जाण्याचा मार्ग बंद

एक्स्प्रेस न्यूज सर्विस, कोचीन

पंतप्रधानांच्या निर्मनुष्य अशा आर्चिपेलागोतल्या बेटावरील सहलीसाठी मुख्यभूमीपासून लक्षद्वीपपर्यंतची माणसांची वाहतूक अक्षरश: बंद करण्यात आली आहे. ज्या कोणाला लक्षद्वीपला जायचं आहे त्यांना पंतप्रधानांची सहल संपेपर्यंत थांबावे लागणार आहे. जानेवारी १५ पर्यंतचं सगळ्या बोटींचं तिकिट वितरण बंद करण्यात आलं आहे. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी असं कारण सांगितलं की, सगळ्या तिकिटांची आगाऊ विक्री झाली आहे आणि काही जागा पंतप्रधानांच्या दौऱ्याशी संबंधित मंत्री व सरकारी अधिकाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. सूत्रांच्या सांगण्यानुसार पंतप्रधानांच्या या सहलीचं नियोजन अनेक महिन्यांपासून सुरू आहे.

डिसेंबर ३०, १९८७

ड्राय डे नसावा, पंतप्रधानांची इच्छा

एक्स्प्रेस न्यूज सर्व्हिस, कोचीन

आर्चपिलेगोमधील बंगाराम बेट, जे राजीव गांधींनी सहलीसाठी निवडलं त्याची एक खासियत आहे. हे एकमेव बेट असं आहे जिथं मद्यपानास परवानगी आहे. मुस्लीम बहुसंख्य असलेल्या अन्य बेटांवर मद्यबंदी काटेकोरपणे पाळली जाते. लक्षद्वीपावर येणाऱ्या प्रवाशांना मद्यपानास परवानगी असलेली दुसरी एकमेव जागा म्हणजे बोटी.

असं सांगण्यात येत आहे की नवीन वर्षाच्या स्वागताची पार्टी पंतप्रधान बोटीवर करण्याचे योजत आहेत. सूत्रांच्या सांगण्यानुसार खास पसंतीच्या मद्यांचे खोकेच्या खोके अतिमहत्त्वाच्या व्यक्तिंसाठी बंगाराम बेटावर पाठवण्यात आले आहेत. चिकन, मटण व ताज्या भाज्या कोचीनवरून आरोग्य निरीक्षकांच्या तपासणीनंतर हवाईमार्गे धाडण्यात येत आहे.

जानेवारी २४, १९८८

अशी होती सहल

एन माधवन कुट्टी, बंगाराम (लक्षद्वीप)

किमान आठ विदेशी नागरिकांचा समावेश पंतप्रधान व त्यांच्या कुटुंबीयांच्या नववर्षाच्या या सहलीमध्ये होता. या सगळ्या ताफ्यामध्ये पुरूष, महिला व मुलं मिळून २४ जण होते. विविध गोष्टींसाठी या २४ जणांची खातिरदारी करण्यासाठी ७० कर्मचाऱ्यांची फळी सज्ज होती. बंगारामच्या सर्व बाजुच्या सुरक्षेसाठी लक्षद्वीप पोलिस व मध्यप्रदेशच्या विशेष पोलिस पथकासह १,२०० पोलिसांची फौज बंगाराम बेटाच्या परीघावर तैनात होती.

 

नौदलाची २४ तास नजर या परीसरावर सुरक्षेच्या दृष्टीनं होती. विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्यानुसार या सहलीसाठी चोख बंदोबस्त पुरवण्यासाठी भारतीय नौदलाच्या आएनएस विराट, आएनएस विंध्यगिरी, आएनएस तारागिरी व आएनएस मगर या युद्धनौका सज्ज होत्या.

लक्षद्वीप प्रशासनाचे ऑइल टँकर्स एमटी सुहेली व एमटी भारत या ही दाखल होत्या. तर एमव्ही भारतसीमा ही प्रवासी नौका व सागरद्वीप ही संशोधक नौकाही नेहमीच्या कामावरून काढून घेऊन या सहलीच्या सेवेत देण्यात आल्या होत्या.

असंख्य अन्य बोटींसह नौदलाच्या यॉच देखील या सेवेसाठी वळवण्यात आल्या होत्या. पंतप्रधान राजीव गांधी व त्यांच्यासोबत असलेले पाहुणे पोहण्याचा व बोटिंगचा आनंद लुटून आले की त्यांच्या करमणुकीसाठीही चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे. समुद्रतीरी पुळणीवर पुरूष व महिलांच्या कबड्डी सामन्याची व्यवस्था करण्यात आली व या सगळ्या सहलीला भारतीय स्पर्श देण्यात आला. पंतप्रधानांचे खासगी सचिव व्ही जॉर्ज, मणी शंकर अय्यर, श्रीमती सरला ग्रेवाल, एम एम जेकब व अन्य व्हिआयपी आयएनएस विराटवर थांबले होते.

जानेवारी २४, १९८८

एक्स्प्रेस न्यूज सर्व्हिस, कोचीन

पंतप्रधानांच्या लक्षद्वीपमधील या नववर्षाच्या स्वागताच्या पार्टीमध्ये राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल, प्रियंकास अजिताभ बच्चन यांच्या तीन मुली, अमिताभ बच्चन, जया भादुरी, अभिषेक बच्चन, श्वेता बच्चन, सोनिया गांधींच्या आई, त्यांची बहीण, भाची व एक जर्मन मैत्रीण यांचा समावेश होता.

एक्स्प्रेस मॅगेझिनचं २४ जानेवारी १९८८ चं मुखपृष्ठ