लोकसभा निवडणुकीचा निकाल गुरूवारी २३ तारखेला जाहीर होणार आहे. भारतातील निवडणुकीकडे जगभराचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्ष काँग्रेसमध्ये प्रमुख लढत आहे. भारतासोबतच पाकिस्तानमध्येही यंदाच्या लोकसभा निकालासंबधी उत्सुकता आहे. २३ तारखेला होणारा निकाल पाकिस्तानमधील भारतीय दुतावासात लाइव्ह दिसणार आहे.

इस्लामाबादमधील भारतीय दुतावासात लाइव्ह निकाल दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी स्पेशल स्क्रीन लावण्यात येणार आहे. भारतीय दुतावासाकडून जश्न-ए-जम्हूरियत नावाने कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. २३ मे रोजी दुपारी दोन वाजेपासून इस्लामाबादमधील भारतीय दुतावासाच्या ऑडिटोरियम आणि लॉनवर स्क्रीनवर प्रसारण केले जाणार आहे. त्यानंतर सायंकाळी साडेसात वाजता निकालावर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

भारतातील लोकसभा निवडणुकीचा सर्वाधिक प्रभाव पाकिस्तानवर पडणार आहे. त्यामुळेच भारतात सुरू असलेल्या निवडणुकीवर पाकिस्तानातील पत्रकार ओपिनियन ब्लॉगसह बातम्यांचे कव्हरेजही देत आहेत. त्याचप्रमाणे पाकिस्तानमधील सोशल मीडियावर भारतीय निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू आहे.