सुहास सरदेशमुख

अशोक चव्हाण, खैरे, जाधव, टोपे, राणा जगजितसिंहांना फटका

हक्काच्या मतदारसंघात प्रमुख नेते काठावर पास झाल्याचे चित्र मराठवाडय़ात आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघात भोकरमधून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना फार आघाडी घेता आली नाही. अर्धापूर, भोकर या मतदारसंघातील नागरी भागातून त्यांना आघाडी मिळाली असली तरी ग्रामीण भागाने चव्हाणांसाठी ‘हात’ आखडता घेतला. तसेच उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात राणा जगजितसिंह पाटील यांना पिछेहाट सहन करावी लागली. सुमारे सात हजारांची ही घट विधानसभा निवडणुकीत त्यांची डोकेदुखी वाढविणारी ठरणार आहे.

शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनाही औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील त्यांचा प्रभाव असणाऱ्या क्षेत्रात त्यांना मिळालेली मते कमी असल्याचे दिसून आले आहे. प्रभाव क्षेत्रातील हे ‘उणे’पण चिंताजनक असल्याने विधानसभा निवडणुकीत त्याचे परिणाम जाणवतील, असे सांगितले जात आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपची सुप्त लाटच होती. सेनेच्या उमेदवारांनाही त्याचा मोठा लाभ झाला. पण ज्या मतदारसंघात एखाद्या नेत्याचा प्रभाव असतो, त्या मतदारसंघातून त्याला मोठी आघाडी मिळणे अपेक्षित असते. मात्र, रावसाहेब दानवे आणि पंकजा मुंडे हे भाजपचे नेते वगळता बहुतांश विधानसभा मतदारसंघात त्या-त्या नेत्यांचा प्रभाव कमी झाल्याचे दिसते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना भोकरमधून सुमारे ४ हजार ८०० मतांची आघाडी मिळाली, तर नायगाव विधानसभा मतदारसंघात त्यांना २१ हजार मते कमी पडली. या विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व काँग्रेसचे नेते वसंत चव्हाण यांच्याकडे आहे. भाजपला मुखेड, देगलूर-बिलोली या मतदारसंघातून मिळालेले मताधिक्य एवढे अधिक होते की, अशोक चव्हाण यांचा पराभव झाला. भोकर मतदारसंघाचे नेतृत्व अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांच्याकडे आहे. त्यांच्या कार्यशैलीविषयी असणारी नाराजी, एकाच कार्यकर्त्यांकडे दिलेल्या दोन-तीन जबाबदाऱ्या यामुळे  कार्यकर्ते नाराज झाले आणि चव्हाण यांना हक्काच्या मतदारसंघातून फारसे मताधिक्य मिळालेले नाही. या मतदारसंघातून अशोक चव्हाण यांना मताधिक्य का मिळू शकले नाही, याचे विश्लेषण नांदेडमधील काँग्रेसचे नेते करू लागले आहेत.

परभणी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडे असणाऱ्या विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेला पाठबळ मिळाले आहे. त्यामुळे घनसावंगी मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या आमदार राजेश टोपे, गंगाखेडचे नेतृत्व करणारे मधुसूदन केंद्रे, जिंतूरचे नेतृत्व करणारे विजय भांबळे यांना  नव्याने बांधणी करावी लागेले. माजी मंत्री राजेश टोपे यांच्या घनसावंगी मतदारसंघात शिवसेनेला मिळालेली २४ हजारांची आघाडी ही टोपेंसाठी चिंतेची बाब आहे.

या लोकसभा निवडणुकीत उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून राणा जगजितसिंह पाटील यांना ८४१२ मते कमी मिळाली. गेल्या वेळी विधानसभेच्या निवडणुकीत ओम राजेनिंबाळकर यांचा राणा जगजितसिंह पाटील यांनी १० हजार ८०६ मतांनी पराभव केला होता. आता ओम राजेनिंबाळकर यांना अधिकची मते मिळाली आहेत. त्यामुळे उस्मानाबादे चुरस निर्माण होईल. अन्य मतदारसंघात सेनेला मताधिक्य आहे. त्यात औसा आणि बार्शी या उस्मानाबाद जिल्ह्य़ाबाहेरील मतदारसंघांचा वाटा अधिक आहे.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात चंद्रकांत खैरे यांना औरंगाबाद शहरातील हडको-सिडको भागातूनदेखील कमी मते मिळाली. औरंगाबाद मध्य आणि पूर्व या विधानसभा मतदारसंघातही सेनेला मताधिक्य मिळवता आले नाही. परिणामी खैरे पराभूत झाले. त्यांना त्यांच्या मतदारसंघात प्रभाव निर्माण करता आला नाही. तसेच हर्षवर्धन जाधव यांना कन्नड मतदारसंघात मताधिक्य घेता आले नाही. तिथून खासदार खैरे यांना मताधिक्य आहे. आमदार म्हणून जाधव यांनी केलेले काम आणि त्यांचा स्वभाव याचा परिणाम त्यांच्या मतदारसंघात दिसून आला. या मतदारसंघात शिवसेनेचे उदयसिंह राजपूत यांनी केलेली संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत असल्याचे दिसून आले आहे. मात्र, हक्काच्या मतदारसंघातून नेत्यांचा प्रभाव ओसरत असल्याचे चित्र लोकसभा निवडणुकीच्या मतदानातून अधोरेखित झाले आहे.

अशोक चव्हाणांचा पराभव कशामुळे?

काँग्रेसचे अशोक चव्हाण यांना भोकरमधून सुमारे ४ हजार ८०० मतांची आघाडी मिळाली. भोकर मतदारसंघाचे नेतृत्व अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांच्याकडे आहे. त्यांच्या कार्यशैलीविषयी नाराजी आहे. चव्हाण यांना हक्काच्या मतदारसंघातून फारसे मताधिक्य का मिळू शकले, याचे विश्लेषण सुरू आहे.

प्रभावाअभावी चंद्रकांत खैरेंचा पराभव

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात चंद्रकांत खैरे यांना औरंगाबाद शहरातील हडको-सिडको भागातूनदेखील कमी मते मिळाली. औरंगाबाद मध्य आणि पूर्व या विधानसभा मतदारसंघातही सेनेला मताधिक्य मिळवता आले नाही. परिणामी खैरे पराभूत झाले. त्यांना त्यांच्या मतदारसंघात प्रभाव निर्माण करता आला नाही.