आमदार-नगरसेवकांत खडाजंगी

जळगावमध्ये भाजपमधील अंतर्गत असंतोष चव्हाटय़ावर येण्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी नाशिकमधील सिडको येथील एका प्रभागात परस्पर प्रचार केल्यावरून भाजपचे नगरसेवक मुकेश शहाणे आणि आमदार सीमा हिरे यांच्यात खडाजंगी झाली. भाजपच्या नेत्यांमधील हा वाद स्थानिकांनाही पाहायला मिळाला. गर्दी जमल्याने काहींनी मध्यस्थी करत त्यावर पडदा टाकला. गुरुवारी सकाळी उत्तमनगरलगतच्या बुद्ध विहार परिसरात हा प्रकार घडला.

दरम्यान, पेलिकन पार्क विकसित करण्यावरून भाजप आमदार आणि संबंधित नगरसेवक यांच्यात श्रेयवाद सुरू असून या वादाला ती किनार असल्याचे सांगितले जाते. महापालिका निवडणुकीपासून स्थानिक भाजपमध्ये नवे आणि जुने पदाधिकारी यांच्यात काही वाद आहेत. त्याचे दर्शन अधूनमधून घडत असते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात त्याची पुनरावृत्ती झाली.

आमदार हिरे कार्यकर्त्यांसोबत लोकसभा निवडणुकीचा प्रचार करत होत्या. स्थानिक नगरसेवक मुकेश शहाणे यांनी त्यास विरोध केला. स्थानिक नगरसेवकांना कल्पना न देता प्रभागात परस्पर प्रचार करण्यास त्यांनी हरकत घेतली. यावेळी हिरे यांनी त्यांना सुनावल्याचे सांगितले जाते. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली. शहाणे हे भाजपचे नगरसेवक होण्याआधी मनसेमध्ये होते. तो मुद्दाही यावेळी मांडला गेला. अखेर काहींनी हस्तक्षेप करत वाद मिटवला. दरम्यान, सिडकोतील पेलिकन पार्क विकसित करण्यावरून श्रेयवादाची लढाई सुरू असून आमदार हिरे यांनी पाठपुरावा करीत राज्य सरकारकडून नऊ कोटींचा निधी मंजूर केला आहे. महापालिकेमार्फत पेलिकन पार्क विकसित होणार असल्याने त्याचे श्रेय भाजपचे स्थानिक नगरसेवकही घेत आहेत. प्रचारातील वादाचा संबंध श्रेयवादाशी जोडला जात आहे. शहाणे यांनी वाद झाल्याचे मान्य केले, परंतु हिरे यांनी कोणताही वाद घडला नसल्याचे सांगितले.

नगरसेवक आणि आपल्यात असा कोणताही वाद घडलेला नाही. वादाची पसरवलेली माहिती निव्वळ अफवा आहे. काही विघ्नसंतोषी घटकांचे अफवा पसरवून प्रचारात अडचणी निर्माण करण्याचे हे षडयंत्र आहे.

– सीमा हिरे (आमदार, भाजप)

स्थानिक नगरसेवकांना पूर्वकल्पना न देता आमदार प्रभागात परस्पर प्रचार करत होत्या. त्यास आपण आक्षेप घेतला. भाजपमध्ये इतक्या मोठय़ा पदावर असणाऱ्या लोकप्रतिनिधींनी सर्वाना विश्वासात घेणे गरजेचे आहे.

– मुकेश शहाणे (नगरसेवक, भाजप)