काँग्रेसचे सरकार सत्तेवर असताना त्यांनी धो-धो खाल्ले, त्यांचे खरकटे काढण्यात आमची पाच वर्षे गेली, अशी टीका ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी  केली.

शिर्डी लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खासदार.सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ नेवासा फाटा येथे आयोजित केलेल्या सभेत त्या बोलत होत्या.या वेळी खा.लोखंडे, आमदार नरेंद्र दराडे, बाळासाहेब मुरकुटे,युवा मोर्चाचे सचिन तांबे,भाजप तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे,युवा सेनेचे नीरज नांगरे,शिवसेना तालुकाप्रमुख मच्छिंद्र म्हस्के, हरिभाऊ शेळके,नितीन जगताप उपस्थित होते.

ना.मुंडे म्हणाल्या,की खासदार लोखंडे हे गवगवा न करता काम करणारे नेते आहेत. त्यांच्या कामाची पद्धत चांगली आहे.ग्रामविकास खात्यांतर्गत प्रत्येक माणसाच्या जीवनाच्या प्रत्येक अंगाशी निगडित काम करण्याचा अनुभव मिळाला.या खात्यांतर्गत विकास निधीचा पाऊस राज्यात पडला. जलसंवर्धन,आरोग्य , घरकुल,रस्ते यामध्ये मोठे काम उभे केले आहे. जास्त निधी राज्याला दिला गेला.तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत देखील या परिसरात दोनशे बारा कोटींचा निधी दिला. त्याचे वाटप करताना कोणताही भेदभाव केला नसल्याने सर्व भागाचा विकास झाला आहे. राज्यात घरकुल वाटपाचे काम एवढे चांगले झाले, की केंद्राने १० लाख घरे राज्यासाठी पुन्हा मंजूर केली असल्याने बेघरमुक्त महाराष्ट्र योजना आपण पूर्ण करत आहोत.मोदी सरकार काळात स्वच्छता अभियान,जनधन योजना या सारख्या योजनांमुळे दलाल संपले आहेत.सध्या विरोधकांच्या महाखिचडीचा नेता कोण आहे हे त्यांनाच सांगता येत नाही, पण आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्थिर व मजबूत सरकार देणारे ठरले आहेत. या वेळी आमदार बाळासाहेब मुरकुटे म्हणाले,की ग्रामीण विकास खात्याच्या माध्यमातून राज्यात परिवर्तन करण्यात ना.मुंडे यांनी मोठे कार्य उभे केले आहे.

खा.लोखंडे म्हणाले,की माझी ही नववी निवडणूक असून मागील पाच वर्षांंमध्ये निळवंडेच्या चारीचा मोठा प्रश्न मार्गी लावला आहे.

पुढील पाच वर्षांत मतदार संघात पंचतारांकित औद्य्ोगिक वसाहत आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.विरोधी उमेदवारांवर टीका करताना ते म्हणाले,की भाऊ साहेब कांबळे यांचे साधे पाटकरी ही ऐकत नाही, तर दुसरे उमेदवार हे साईबाबांच्या झोळीतील तुपात अडकले आहेत.त्यांच्यापेक्षा जास्त प्रश्न मी सोडविले आहेत. माजी तालुकाप्रमुख बाळासाहेब पवार यांनी आभार मानले.