मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी मी ज्या दिवशी तुरुंगात गेले त्या दिवशी सुतक सुरु झाले आणि ज्या दिवशी हेमंत करकरे यांना दहशतवाद्यांनी मारले, त्यादिवशी सुतक संपले असे वादग्रस्त विधान साध्वी प्रज्ञासिंह यांनी केले आहे. याच वक्तव्यावरुन भाजपाच्या प्रवक्त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘साध्वी यांना त्यांच्यावर झालेला अत्याचार लोकांसमोर मांडण्यचा अधिकार आहे’ असं मत भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केले आहे.

साध्वी प्रज्ञासिंह यांनी भोपाळमध्ये गुरुवारी एका कार्यक्रमात शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले भाष्य केले. भाजपाच्या भोपाळमधील उमेदवार असणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंह या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आहेत. त्यांनी केलेल्या या विधानाबद्दल बोलताना वाघ यांनी, ‘या वक्तव्याचा निषेध करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. ‘पोलिसांनी साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर अत्याचार केले, त्यांचे हालहाल केले. हे अधिकार पोलिसांना कोणी दिले होते?’ असा उलटा सवाल वाघ यांनी उपस्थित केला.

नक्की वाचा >> दहशतवाद्यांनी हेमंत करकरेंना मारुन माझं सुतक संपवलं: साध्वी प्रज्ञासिंह

‘साध्वी प्रज्ञासिंह भाजपाच्या उमेदावार आहेत. त्यांनी आपल्या मनातली खदखद व्यक्त केली आहे. पाप, पुण्य, शाप उपशापावर आमचा विश्वास नाही पण एखाद्या व्यक्तीविरोधात बोलण्याचा साध्वी प्रज्ञासिंह यांना अधिकार आहे. हा अधिकार तुम्ही आम्ही काढून घेऊ शकत नाही. या देशात व्यक्तीस्वातंत्र्य आहे आणि हे मत म्हणजे व्यक्तीस्वातंत्र्याचाच भाग आहे,’ असं वाघ म्हणाले. तसेच ‘करकरे शहीद होणे आणि साध्वी प्रज्ञासिंह यांचे वक्तव्य दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यांच्यावर झालेले अत्यचार लोकांसमोर मांडण्याचा अधिकार त्यांना आहे. त्यांनी केलेलं विधान हे त्यांच मत आहे,’ असंही वाघ म्हणाले आहेत. याचप्रमाणे ‘सावकरांना दुषणे देणाऱ्या काँग्रेसला कोणी प्रश्न विचारलं नाही. सावकरांविरुद्ध बोलणाऱ्यांना का विचारत नाहीत.’ असा सवालही वाघ यांनी उपस्थित केला आहे.

काय म्हणाल्या साध्वी

साध्वी प्रज्ञासिंह यांनी भोपाळमध्ये गुरुवारी एका कार्यक्रमात शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी भाष्य केले.साध्वी प्रज्ञासिंह या भाजपाच्या भोपाळमधील उमेदवार असून त्या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आहेत. हेमंत करकरे यांनी मला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप त्यांनी केला. “तो तपास अधिकारी सुरक्षा आयोगाचा सदस्य होता. त्याने हेमंत करकरे यांना बोलावले आणि सांगितले की पुरावे नसतानाही साध्वीला तुरुंगात का डांबले. यावर हेमंत करकरे यांनी सांगितले की, मी काहीही करेन, पण साध्वीविरोधात पुरावे सादर करणारच, मी साध्वीला सोडणार नाही”, असा आरोप साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केला.

त्या पुढे म्हणाल्या, हेमंत करकरे याने हा देशद्रोह केला होता. तो मला विचारायचा की खरं जाणून घेण्यासाठी मला देवाकडे जावं लागेल का. यावर मी म्हटलं की तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही जाऊ शकता. मी करकरे यांना सांगितले की तुमचा सर्वनाश होईल. त्याने मला शिवीगाळ केली होती. ज्या दिवशी मी तुरुंगात गेले त्या दिवशी सुतक सुरु झाले आणि ज्या दिवशी दहशतवाद्यांनी करकरे यांना मारले त्या दिवशी सुतक संपले, असे वादग्रस्त विधान साध्वींनी केले. रावणाचा अंत प्रभू रामाने संन्याशांच्या मदतीने केला होता. २००८ मध्येही हेच झाले. निरपराध संन्याशांना तुरुंगात डांबण्यात आले. यावर मी सर्वनाश होईल असा श्राप दिला होता आणि त्यानंतर काय झाले हे सर्वांनाच माहित आहे, असे साध्वींनी म्हटले आहे.

साध्वी यांच्या या वक्तव्यावरुन आता राजकारण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.