विविध एक्झिट पोल्समधून भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पुन्हा सत्ता मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यापार्श्वभूमीवर विरोधी पक्ष भाजपाविरोधात आपली आघाडी अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहेत. चंद्राबाबू नायडू भाजपा विरोधातील पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांनी विविध पक्षीय नेत्यांना भेटण्याचा सपाटा लावला आहे.

आंध्र प्रदेशातील चंद्राबाबू नायडूंचे प्रतिस्पर्धी जगनमोहन रेड्डी यांनी मात्र अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. ते एनडीए सोबत आहेत की, यूपीएसोबत ते जगनमोहन रेड्डी यांनी जाहीर केलेले नाही. निवडणूक निकालानंतर त्यांच्या वायएसआसीपी पक्षाची भूमिका महत्वाची ठरु शकते.

एक्झिट पोलचे आकडे जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जगनमोहन रेड्डी यांना फोन केला होता. पण त्यांनी शरद पवारांचा फोन उचलणे टाळले. इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआसीपी पक्षाला काँग्रेसप्रणीत संपुआसोबत जोडण्यासाठी त्यांना फोन केला होता. पण जगनमोहन रेड्डी यांनी हा फोन टाळला.

जगनमोहन रेड्डी आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांना दणका देऊ शकतात. आंध्र प्रदेशला जो विशेष राज्याचा दर्जा देईल त्याच्यासोबत जाऊ असे जगनमोहन रेड्डी यांनी आधी सांगितले होते. इंडिया टुडे -माय एक्सिस एक्झिट पोलनुसार वायएसआरसीपी पक्षाला लोकसभेच्या १८ ते २० जागा मिळू शकतात तर चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीला चार ते सहा जागांवर मर्यादीत रहावे लागेल. आंध्रप्रदेशात लोकसभेच्या एकूण २५ जागा आहेत.