समीर जावळे, जळगाव

लोकसभा निवडणुकीत कमळ फुलणार आणि मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार असा विश्वास डॉ. अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगाव या महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलींनी व्यक्त केला आहे. बीकॉमच्या पहिल्या वर्षाला असलेली अर्चना सांगते पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कायम टीका होते की त्यांनी काहीही कामं केलेली नाहीत. मात्र महाविद्यालयात आम्हाला बदल दिसतो आहे. विद्यार्थ्यांना आघाडीचं सरकार असताना सवलती मिळत नव्हत्या. त्या मोदी सरकार आल्यापासून मिळत आहेत. विरोधक तर त्यांच्यावर टीका करणारच मात्र मला वाटतं की देशात कमळ फुलेल आणि पुन्हा एकदा मोदीच पंतप्रधान होतील.

याच महाविद्यालयात सेकंड इयर बी. कॉमला शिकणारी अंजली पाटील सांगते मोदी हे युवकांसाठी आदर्श आहेत. आज फक्त आमच्या सारख्या युवा वर्गालाच नाही तर अगदी लहान मुलांनाही मोदी आवडतात. सगळ्यांच्या तोंडी मोदी नावाचाच गजर आहे. काही लोकांना वाटतं की मोदींनी काहीही कामं केलेली नाहीत. मात्र खेडोपाड्यांपर्यंत त्यांनी योजना पोहचवण्यास सुरूवात केली आहे. त्यांना आणखी एक संधी दिलीच पाहिजे असं मला वाटतं. तसंच जळगावातही भाजपाचे उमेदवार उन्मेष पाटील निवडून येतील असाही विश्वास अंजली पाटीलने व्यक्त केला.

याच महाविद्यालयात शिकणारी सविता जाधव म्हणते, महिलांचे अनेक प्रश्न सोडवण्यात मोदी यशस्वी झाले आहेत. आम्हाला या गोष्टीचे समाधान आहे की निदान आमचे ऐकून घेतले जाते. आज अन्याय झाला अत्याचार झाला तर पुढे येऊन आम्हाला सांगता येतो. त्याची दखल घेतली जाते आणि हा बदल आमच्यासाठी निश्चितच महत्त्वाचा आहे. नरेंद्र मोदींना आणखी एक संधी दिली पाहिजे त्यामुळे ते महिलांचे अनेक प्रश्न मोदींनी सोडवण्यास सुरूवात केली आहे. उज्ज्वला गॅस योजना असेल, स्वच्छ भारत योजने अंतर्गत शौचालयांची निर्मिती हा महत्त्वाचा निर्णय आहे.

अनेक महिला अडचणी आल्या तर सांगत नाही, मात्र त्या बाहेर आल्या तर त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो. महिलांनी मोठ्या प्रमाणावर पुढे येण्याची हिंमत दाखवली पाहिजे अन्यायाला वाचा फोडली पाहिजे. मोदी सत्तेवर आले तेव्हापासून त्यांनी विद्यार्थ्यांसाठी, महिलांसाठी लहान मुलांसाठी अनेक योजना आणल्या. त्यांच्या या योजना पूर्णपणे यशस्वी झाल्या आहेत असं अजून म्हणता येणार नाही मात्र कुठेतरी एक चांगली सुरूवात झाली आहे आणि त्यामुळे नवमतदार म्हणून आम्ही मोदींनाच मतदान करू असं मत रूपाली शेवाळे या विद्यार्थिनीने व्यक्त केलं आहे.