वाराणसीत 100 हून अधिक निवृत्त आणि निलंबित लष्कर आणि निमलष्कराच्या जवानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात प्रचार करण्याचा निर्धार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लष्कराला दुर्बळ करत असून भष्टाचाराला खतपाणी घालत असल्याचं जवानांचं म्हणणं आहे. हे सर्व जवान वाराणसीमधील मडुआ डीह येथे थांबले आहेत.

हे सर्व जवान जेवणाच्या निकृष्ट दर्जाची तक्रार करणाऱ्या सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) जवान तेज बहादूर यांच्या समर्थनार्थ प्रचार करणार आहेत. टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार, या सर्व जवानांनी नरेंद्र मोदींना उमेदवारी अर्ज दाखल करताना काळे झेंडे दाखवण्याचा निर्धार केला होता. आपण एक खरे चौकीदार असून, खोट्या चौकीदाराविरोधात लढत आहोत असं तेज बहादूर यांनी सांगितलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडे आपण लष्कराला योग्य मान मिळवून दिल्याचा दावा करत असतानाच तेज बहादूर यांचा प्रचार सुरु आहे. नरेंद्र मोदी आपण पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राइक केल्याचं सांगत मतदान करण्याचं आवाहन करत आहेत. याचप्रकरणी माजी लष्कर प्रमुखांसहित अनेक निवृत्त जवानांनी राष्ट्रपतींकडे तक्रार केली आहे.

सर्जिकल स्ट्राइकसहित अशी दोन कारणं आहेत ज्यासाठी माजी आणि निलंबित जवानांनी मोदींना विरोध केला आहे. 29 सप्टेंबर 2016 रोजी नियंत्रण रेषेवर दहशतवादी तळांवर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकची माहिती सार्वजनिक केल्याप्रकरणी जवान नरेंद्र मोदींना दोषी ठरवत आहेत. याशिवाय 2014 लोकसभा निवडणुकीत भ्रष्टाचाराविरोधात कारवाई केल्याचं आश्वासन देऊनही अद्याप भ्रष्ट अधिकाऱ्यांना सोबत देत आहेत.

आपले अधिकारी आणि भ्रष्टाचाराचा विरोध केल्याची किंमत आपल्याला चुकवावी लागत असल्याचं जवानांचं म्हणणं आहे. सरकारने भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याची तक्रार आहे. 2001 साली लष्करातून निवृत्त झालेले 62 वर्षीय ओम प्रकाश सिंह यांनी सांगितलं आहे की, ‘सप्टेंबर 2016 मध्ये करण्यात आलेली सर्जिकल स्ट्राइक पहिलीच नव्हती. मी स्वत: याआधी पाकिस्तानात जाऊन कऱण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकचा भाग राहिलो आहे’.

सीआरपीएफमधून निलंबित झालेले 32 वर्षीय पंकज मिश्रा यांनी सांगितलं आहे की, ‘जवानांकडून जवळपास चार हजार तक्रारी आल्या आहेत. यामध्ये अधिकाऱ्यांकडून आपल्या घरातील छोटी कामं करण्यासाठी जबरदस्ती केली जात असल्याचाही उल्लेख आहे. या सर्व तक्रारी गेल्या तीन वर्षांपासून पंतप्रधान कार्यालयात प्रलंबित आहेत’.