पाच वर्षे टीका करून शिवसेना मोदींच्या मिठीच्या कशी काय शिरते ? असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे उमेदवार आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या प्रचारार्थ चाळीसगाव मध्ये सभा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी जयंत पाटील यांनी ही टीका केली.

निवडणुकीत मतदान करण्याआधी मोदींच्या नाकर्तेपणाच्या मुद्द्यांवर जनतेने विचार करावा असेही त्यांनी म्हटले आहे. नोटाबंदीचा निर्णय घेतल्यावर कमिशनवर नोटा बदलण्याचे काम झाले. या निर्णयानंतर देश सर्व बाजूने लुटून झाला असाही आरोप पाटील यांनी केला.

याच सभेत जितेंद्र आव्हाड यांनीही भाजपावर आणि मोदींवर सडकून टीका केली. २०१४ मध्ये विविध आश्वाासनं मोदींनी जनतेला दिली, अनेक स्वप्नं दाखवली पण ते एकप्रकारचे मृगजळ होते. पाच वर्षात नरेंद्र मोदींनी कोणती कामं केली यावर ते काहीच बोलत नाहीत. पाकिस्तानला धडा कसा शिकवला हे सांगतच मतं मागत आहेत अशीही टीका आव्हाड यांनी केली. पुलवामा घटनेचा हिशोब देशाला हवाय. याला जबाबदार कोण याचे उत्तर आपण द्यावे, ही जनतेची अपेक्षा आहे. भावनांचे राजकारण करण्याचे काम मोदी करत आहेत असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले. देशाच्या जनतेने यावर विचार करण्याची गरज आहे. जळगाववासियांनो आपली किंमत अजून कमी करुन घेऊ नका असेही आव्हाड यांनी म्हटले आहे.

या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार मनिष जैन, माजी आमदार ईश्वर जाधव, राजीव देशमुख, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, निरीक्षक करण खलाटे, उमेश नेमाडे, रामचंद्र जाधव, ज्ञानेश्वर माळी आदींसह महाआघाडीचे नेते व्यासपीठावर उपस्थित होते.