पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी गोंदियामधील प्रचारसभेमध्ये राष्ट्रावादीच्या नेत्यांवर केलेल्या टिकेल्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप तिहार जेलवर अवलंबून आहे असं वक्तव्य करणाऱ्या मोदींना आव्हाड यांनी उत्तर देताना, ‘आम्ही अटकेला घाबरणाऱ्यांमधले नाही’ असं म्हटलं आहे.

मोदींनी गोंदीया येथील प्रचारसभेमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांना तिहार जेलची भिती वाटत असल्याचे वक्तव्य केले होते. ‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आजकाल झोप येत नाही. त्यांची झोप तिहार जेलवर अवलंबून आहे. तिहार जेलच्या आत जो गेला आहे तो काही बोलेल का, हा प्रश्न त्यांना छळतो आहे. सर्व गोष्टी लवकरच बाहेर येतील, तो दिवस दूर नाही’, असं विधान पंतप्रधानांनी या सभेमध्ये केलं होतं. या वक्तव्यावरुनच आव्हाड यांनी मोदींना सुनावले आहे. ‘चंद्रकांत पाटील आणि मोदींमध्ये काहीच फरक नाही. चंद्रकांत पाटील हे राज्यातील मंत्री आहेत. पण ते जे बोलतायत तेच मोदी पंतप्रधान म्हणून बोलताय. हे दोघेही फक्त घाबरवण्याचं काम करतात. दर चोवीस तासाने पाच मिनिटे ते तुम्हाला पकडू, तुम्हाला पकडू असं करत घाबरवण्याच काम करतात. अटकेला घाबरून पळवणाऱ्यांची तुमची जात, आम्ही घाबरणाऱ्यांमधले नाही. स्वातंत्र्यलढ्यात जेवढे माफीनामे आहेत ते सर्वजण तुमचे नातेवाईक आहेत. ती तुमची पिल्लावळ आहे. अटकेला सामोरे गेलेले गांधी होते,’ असं सांगत आव्हाड यांनी मोदींच्या व्यक्तव्याचा समाचार घेतला आहे.

अटकेसंदर्भात वक्तव्य करणाऱ्या मोदींकडेच पाच वर्ष सत्ता होती तर अटक करायला त्यांना कोणी अडवलं होत का?, असा सवालही आव्हाड यांनी केला आहे. ‘मोदी उगाच हवेत बाण मारून कशाला घाबरवत आहात. तिहारमध्ये बसलाय, येरवड्यात बसलाय, तळोज्यात बसलाय, कोर्टात केस सुरुय असं म्हणून कशाला घाबरवता. पाच वर्ष तुमच्याकडे सत्ता होती. अटक करायला तुम्हाला कोणी अडवलं होत का? पुलवामा, बालाकोट आणि सॅटेलाईट क्षेपणास्त्र हे तीन मुद्दे वगळल्यास मोदींकडे मुद्देच नाहीत. रोजगार दिलेला नाही, महगाई कमी झाली नाही, विकास झालाच नाही, १५ लाख झालेच नाही तर मोदी बोलणार कशावर? पाच वर्षांपूर्वी दिलेले कोणतंच आश्वासन पंतप्रधान मोदी पूर्ण केलेलं नाही. मोदी प्रचारसभांमध्ये अशा विषयांवर बोलतायत जे या देशाचे विषयच नाहीत. ज्या अपेक्षेने लोकांनी तुम्हाला भरघोस मतांनी निवडून दिलं त्या अपेक्षांचा आणि स्वप्नांचा चुराडा होताना लोकं पाहत आहेत’, असं आव्हाड म्हणाले. तसेच मोदींनी भूक, गरिबी, वाढती बेरोजगारी आणि शेतकरी समस्यांवर बोलावे अशी इच्छा आव्हाड यांनी व्यक्त केली.