पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राजस्थानच्या बाडमेरमधील सभेमध्ये पाकिस्तान वारंवार भारताला त्यांच्याकडे असलेल्या अण्वस्रांची धमकी देत आला आहे. मात्र, आता भारत त्यांच्या धमक्यांना घाबरत नाही. आमच्याकडेही अण्वस्त्रं आहेत ते आम्ही दिवाळीसाठी राखून ठेवलेले नाहीत, असे वक्तव्य केले होते.

त्यावर पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी पाकिस्तानकडे जी अण्वस्त्रे आहेत ती सुद्धा त्यांनी ईदसाठी ठेवलेली नाहीत. इथे हिशोब बरोबर केला जातो अशा शब्दात मोदींना प्रत्युत्तर दिले.

काय म्हणाले होते मोदी
भारताने पाकिस्तानच्या धमक्यांना घाबरण्याचे धोरण आता सोडून दिले आहे. याआधी पाकिस्तान नेहमी भारताला अण्वस्रांची धमकी देत होता. पाकिस्तान म्हणायचा की आमच्याकडे न्युक्लिअर बटन आहे. मग भारताकडे काय आहे? आमच्याकडील अण्वस्त्रं आम्ही दिवाळीसाठी ठेवलेली नाहीत.

भारत आज युद्ध न करता पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांना ठार करीत आहे. आम्ही दहशतवाद्यांच्या मनात दहशत निर्माण केली आहे. पाकिस्तानला मिळालेल्या खुल्या सूटमुळे देशात दहशतवादी हल्ले सामान्य गोष्ट बनली होती. आपल्या मतांमुळेच हे दहशतवादी हल्ले कमी झाले आहेत. आम्ही दहशतवाद्यांची सगळी मस्ती जिरवली आहे. त्यांना कटोरा घेऊन देशभरात फिरण्यास भाग पाडले आहे, अशा शब्दांत त्यांनी जनतेला संबोधित केले.
आमच्या सरकारच्या काळातच भारत जगातील त्या शक्तींमध्ये समाविष्ट झाला ज्या देशांकडे पाणी, आकाश, भूमीवरुन अणूहल्ला करण्याची क्षमता आहे. नुकतेच आम्ही आणखी एक मोठे काम केले आहे. अंतराळातही आपली संपत्ती वाचवण्याची क्षमता निर्माण केली आहे.