इंद्रायणी नार्वेकर
कामत समर्थकांची नाराजी कायम
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार संजय निरुपम यांनी युतीचे उमेदवार गजानन कीर्तीकर यांना खुले आव्हान दिले असले, तरी पक्षांतर्गत गटबाजीच त्यांना भोवण्याची चिन्हे आहेत. मुंबई काँग्रेसमधील निरुपम आणि गुरुदास कामत गटातील हाडवैर सर्वश्रूत आहेच; आता कामत हे हयात नसले तरी, त्यांच्या समर्थकांची निरुपम यांच्यावरील नाराजी कायम आहे.
मुंबई काँग्रेसमध्ये अनेक नेत्यांचे गट आहेत. यापैकी कामत आणि निरुपम या दोन गटांत नेहमीच वर्चस्वावरून संघर्ष होत होता. या वर्चस्ववादातूनच कामत यांनी जाहीरपणे राजकीय संन्यास घेतला. आज कामत हयात नसले तरी, ज्या मतदारसंघावर एकेकाळी त्यांचे वर्चस्व होते, त्या उत्तर पश्चिम मतदारसंघातूनच निरुपम हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.
२००९ मध्ये या मतदारसंघातून गुरुदास कामत हे भरघोस मतांनी जिंकून आले होते. त्यानंतर सन २०१४ मध्ये कीर्तीकर यांनी कामत यांचा पराभव केला. आता याच मतदारसंघात कीर्तीकर विरुद्ध निरुपम अशी लढत होणार आहे. या मतदारसंघात तीन आमदार शिवसेनेचे तर तीन आमदार भाजपचे आहेत. तर मनसेनेही निरुपम यांना सहकार्य न करण्याची ठाम भूमिका जाहीर केली आहे.
संजय निरुपम यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात कामत गटातील कार्यकर्त्यांना लांब ठेवले होते. विधानसभा आणि पालिका निवडणुकीत कामत गटातील लोकांना तिकीट मिळणार नाही, याची पुरेपूर काळजी त्यांनी घेतली होती. निरुपम यांच्या या वागणुकीमुळे दुखावलेले अनेक कार्यकर्ते कॉंग्रेस सोडून अन्य पक्षात गेले. आताच्या निवडणुकीत कामत गटातील हे आजी माजी कार्यकर्ते निरुपम यांच्या विरोधात आहेत.
First Published on April 18, 2019 1:39 am