बिहारमधील बेगुसराय मतदारसंघातून निवडणुक लढवणारे विद्यार्थी नेते कन्हैयाकुमार यांच्या प्रचारादरम्यान घडलेल्या एका प्रसंगाचा व्हिडिओ समोर आला आहे. बेगुसरायमधील एका गावामध्ये रोड शो करण्यासाठी गेलेलेया कन्हैयाकुमार यांचा रस्ता अडवून स्थानिक गावकऱ्यांनी कन्हौयांविरोधात घोषणाबाजी सुरु केली. नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) घोषणाबाजीमुळे कन्हैयाकुमार पहिल्यांदा प्रसिद्धीच्या झोतात आले. याच जेएनयूबद्दल या गावकऱ्यांनी कन्हैयाकुमार यांना प्रश्न विचारले. देशाविरोधात घोषणाबाजी करण्यासंदर्भात अनेक प्रश्नांचा या गावकऱ्यांनी कन्हैयाकुमार यांच्यावर माराच केला. कन्हैयाकुमार यांना ‘तुम्हाला कोणत्या गोष्टीपासून आझादी हवीय?’ असा सवाल गावातील तरुणाने केल्याचे स्थानिक प्रसारमाध्यमांचे म्हणणे आहे.

हाती आलेल्या वृत्तानुसार ‘भारत तेरे तुकडे होंगे’ या घोषणाबाजीवरुन अनेकांनी कन्हैयाकुमार यांना प्रश्न विचारले. गावकऱ्यांनी कन्हैयाकुमार यांच्या रोड शोचा रस्ता अडवला आणि गाडीला सर्वबाजूने घेरले. त्यानंतर त्यांनी कन्हैयाकुमार यांच्यावर प्रश्नांचा मारा सुरु केला. जेव्हा तुम्ही जेएनयूमध्ये होता तेव्हा तुम्ही कोणत्या प्रकारच्या स्वातंत्र्याची आणि आझादीची मागणी करत होता? असा सवाल गावकऱ्यांनी कन्हैयाकुमार यांना केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे असणारे गावकऱ्यांपैकी एकजण कन्हैयाकुमार यांना २०१६ मध्ये जेएनयूच्या आवारात झालेल्या आंदोलनाबद्दल प्रश्न विचारताना दिसत आहेत. कन्हैयाकुमार यांनी त्यांच्याबरोबर शिकणाऱ्या उमर खालिद आणि इतर विद्यार्थ्यांच्या सोबतीने विद्यापिठाच्या परिसरामध्ये आझादी मागण्यासंदर्भातील घोषणाबाजी केल्याचा आरोप करण्यात आला होता. ‘तुम्हाला कोणती आझादी हवी आहे? गरीबांना कोणतीही आझादी नकोय. हे चांगलं झालय की तुम्ही राजकारणामध्ये आला आहोत. मात्र तुम्ही आर्थिक दृष्ट्या मागास वर्गाला १० टक्के आरक्षण देण्याला विरोध का केला?’ असा सवाल एका व्यक्तीने कन्हैयाकुमार यांना केला. याच तरुण व्यक्तीने पुढे ‘तुम्ही २०१६ मध्ये जेएनयूमध्ये भारत तेरे तुकडे होंगे’ अशी घोषणाबाजी का केली?’ असा सवाल कन्हैयाकुमार यांना केला. या प्रश्नाला उत्तर देताना कन्हैयाकुमार यांनी, ‘तू भाजपाचा आहेस का?’ असा प्रतीप्रश्न त्या तरुणाला केला. त्यावेळी तरुणाने नाही असे उत्तर देत मी नोटाला मतदान करणार असल्याचे कन्हैयाकुमार यांना सांगितले.

बेगुसरायमध्ये कन्हैयाकुमार यांना अशाप्रकारे विरोध होण्याची ही पाहिली घटना नाहीय. काही दिवसांपूर्वी येथील लोहियानगर भागात प्रचारासाठी जाताना कन्हैयाकुमार यांच्या ताफ्याला स्थानिकांनी काळे झेंडे दाखवले होते. बेगुसराय मतदारसंघात भाजपचे उमेदवार अणि केंद्रीय गिरीराज सिंह, राष्ट्रीय जनता दलाचे तन्वीर हसन आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कन्हैयाकुमार यांच्यात तिरंगी लढत होत आहे. भाजपने गिरीराज सिंग यांना मतदारसंघ बदलून बेगुसरायमध्ये पाठविल्याने ते सुरुवातीला नाराज होते. पण नंतर पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी त्यांची नाराजी दूर केली आणि ते लढण्यास तयार झाले. कन्हैयाकुमार हे रिंगणात असल्याने बेगुसराय मतदारसंघाकडे राष्ट्रीय पातळीवरील माध्यमे आणि राजकीय तज्ज्ञांचे लक्ष गेले आहे.