28 September 2020

News Flash

भाजपाने उमेदवारी नाकारल्यावर किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया

भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी ईशान्य मुंबई मतदारसंघात विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना डावलून मनोज कोटक यांना उमेदवारी दिली आहे

किरीट सोमय्या

भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी ईशान्य मुंबई मतदारसंघात विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना डावलून मनोज कोटक यांना उमेदवारी दिली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या किरीट सोमय्या यांच्या पदरी निराशा पडली आहे. उमेदवारी जाहीर होताच मनोज कोटक यांनी किरीट सोमय्या यांची भेट घेतली. यावेळी दोघांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रतिक्रिया देताना किरीट सोमय्या यांनी पक्षात जबाबदारी एकमेकांना दिली जात असते, यात काही नवीन नाही असं सांगितलं आहे.

किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे की, ‘मनोज कोटक यांच्यासाठी मी खूप आनंदी आहे. आम्हा सर्वांचा त्यांना पाठिंबा असून, ते जिंकतील यासाठी प्रयत्न करु. नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत हेच आमचं ध्येय आहे. पक्षात जबाबदारी एकमेकांवर दिली जात असते. यामध्ये काही नवीन नाही’. देशात नरेंद्र मोदींचं सरकार यावं यासाठी लागेल ते सगळं करणार आहे असं सांगताना मनोज माझ्या धाकट्या भावासारखा असून त्याच्या विजयाची जबाबदारी आपली असेल असंही किरीट सोमय्या यांनी सांगितलं आहे.

किरीट सोमय्या यांना उमेदवारी न मिळण्यामागे शिवसेनेची नाराजी असल्याचं सांगितलं जात आहे. मुंबई महापालिका निवडणुकीदरम्यान किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अनेक वक्तव्यं केली होती. यामुळेच शिवसेना किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला विरोध करत होती. किरीट सोमय्या यांनी वारंवार प्रयत्न करुनही शिवसेनेचा विरोध मावळत नव्हता. किरीट सोमय्या यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेण्याचाही प्रयत्न केला होता. पण भेट नाकारण्यात आल्याने त्यांची निराशा झाली होती.

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात किरीट सोमय्या यांना भाजपची उमेदवारी मिळण्यावरून शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांच्यासह काही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जाहीर टीका करत सोमय्या यांना आव्हान देण्याची भाषा केली होती. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यानंतर किरीट सोमय्या हे नार्वेकर यांच्या घरी सांत्वनासाठी गेले होते. त्यावेळी निरोप घेताना उद्धव ठाकरे यांच्या भेटीची इच्छा सोमय्या यांनी व्यक्त केली होती. त्याचबरोबर संजय राऊत यांच्या भेटीचा प्रयत्न झाला पण ती भेट होऊ शकली नव्हती. मात्र, उद्धव यांना भेटण्यासाठी औपचारिकपणे सोमय्या यांनी मातोश्रीवर विचारणा केली नव्हती, असे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2019 7:01 pm

Web Title: kirit somaiya reaction after party denies ticket from mumbai north east seat
Next Stories
1 ममता बॅनर्जी म्हणजे ‘स्पीड ब्रेकर’, नरेंद्र मोदींचा टोला
2 ‘तिकीट वंचित आघाडी’च्या बॅनरखाली एकत्र येऊन मोदींना धडा शिकवावा, धनंजय मुंडेंचं भाजपा नेत्यांना आवाहन
3 दहशतवादी हल्ल्याला जबाबदार ठरवत मंत्र्याला लगावला ठोसा
Just Now!
X