सागरी किनारा मार्गाच्या विरोधात कोळी समुदायाचा मतदानावर बहिष्कार

आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहावर गदा आणू पाहणाऱ्या आणि समुद्रातील जैवविविधतेच्या मुळावर उठणाऱ्या पालिकेच्या सागरी किनारी मार्ग प्रकल्पाच्या विरोधात वरळी कोळीवाडय़ातील कोळी बांधवांनी बंडाचा झेंडा फडकविला आहे. यासंदर्भात राजकीय पक्ष केवळ आश्वासने देत असल्यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय कोळी समुदायाने घेतला आहे. दक्षिण मुंबईमधून पश्चिम उपनगरांमध्ये झटपट पोहोचता यावे, प्रवासाचा वेळ कमी व्हावा आणि मुख्य म्हणजे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटावा या उद्देशाने नरिमन पॉइंट ते कांदिवलीदरम्यान सागरी किनारा मार्ग उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पातील प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सागरीसेतू दरम्यानचा सागरी किनारा मार्ग उभारण्याची जबाबदारी पालिकेवर सोपविण्यात आली आहे. पालिकेने अमरसन्स उद्यान, वरळी कोळीवाडा आदी भागांत सागरी किनारा मार्गाच्या कामाला सुरुवात केली आहे.

या प्रकल्पासाठी टाकण्यात येणाऱ्या भरावामुळे समुद्रातील जैवविविधतेला धोका निर्माण होण्याची भीती काही सामाजिक संस्थांनी व्यक्त केली होती. सागरी किनारा मार्गासाठी समुद्रात भरावभूमी तयार करण्यात येत असून भविष्यात समुद्राचे पाणी कोळीवाडय़ात शिरून मोठे नुकसान होण्याची भीतीही येथील रहिवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तसेच या प्रकल्पामुळे मासेमारीचा परंपरागत व्यवसाय धोक्यात येण्याची भीती कोळी समुदायाला वाटत आहे. पालिकेने या प्रकल्पाचे काम सुरू करण्यापूर्वी स्थानिक कोळी समुदायाला विश्वासात घेतले नाही, असा त्यांचा आरोप आहे.

सागरी किनारा मार्ग प्रकल्पामुळे निर्माण होणाऱ्या समस्या सोडविण्याबाबत सर्वच राजकीय पक्षांतील नेत्यांसमोर गाऱ्हाणे मांडण्यात आले होते. मात्र एकाही राजकीय पक्षाने वा त्यांच्या नेत्याने मदतीचा हात दिला नाही. त्यामुळेच अखेर आम्हाला न्यायालयात धाव घ्यावी लागली, अशी व्यथा येथील कोळी बांधवांनी मांडली. राजकीय पक्षांनी केवळ आश्वासने देऊन तोंडाला पाने पुसल्यामुळे संतापलेल्या कोळी बांधवांनी लोकसभा निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. वरळी कोळीवाडय़ामध्ये दीड हजारांहून अधिक कोळी बांधवांची कुटुंबे वास्तव्यास आहेत.

बहिष्काराचे अस्त्र

डॉक्टरांसाठी क्लब उभारण्याचा घाट नायगावच्या पुरंदरे मैदानात घालण्यात आला आहे. त्यामुळे हे मैदान वाचविण्यासाठी क्रीडापटू आणि स्थानिक रहिवाशांनी आंदोलन केले. मात्र मैदानात क्लब उभारण्यावर प्रशासन ठाम आहे. त्यामुळे क्रीडापटू आणि नायगावकरांनी मैदान वाचविण्यासाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचे हत्यार उपसले आहे. चेंबूरच्या वाडवली गावातील स्थानिक रहिवाशांनीही खैळाच्या मैदानाच्या प्रश्नावरून येत्या लोकसभा निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे.

सागरी किनारा मार्गामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या समस्या मुख्यमंत्र्यांसह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांसमोर मांडण्यात आल्या होत्या, परंतु केवळ आश्वासनांचे गाजर दाखविण्यात आले. त्यामुळे न्यायालयात धाव घ्यावी लागली. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास असमर्थ ठरणाऱ्या राजकारण्यांना कशासाठी मत द्यायचे?

– नितेश पाटील, रहिवासी