News Flash

देशभक्तीची तप्तचर्चा आणि कारगिलवासीयांचा एकाकी लढा

कारगिल जिल्हा हा लेहसकट लडाख लोकसभा मतदारसंघात येतो. तिथे ६ मे रोजी मतदान आहे.

देवयानी ओनील, कारगिल

देशात निवडणुकीचा माहोल आहे आणि ‘देशभक्ती’चा मुद्दा जोमात आहे. पुलवामाचा हल्ला आणि नंतरच्या लक्ष्यभेदी कारवायांनी ‘जोश’ वाढलेला आहे आणि एकदा निर्णायक युद्ध कराच आणि धडा शिकवाच, अशी प्रचारी भाषा दिल्लीपासून गल्लीपर्यंत निनादत आहे. पण ही तप्तचर्चा कारगिलमधला माणूस थंड नजरेनं आणि विदीर्ण मनानं न्याहाळत आहे.

जवळपास १६ हजार फूट उंचावर असलेले कारगिल आणि द्रास, बटालिक, मुश्को खोऱ्याचा १५० किलोमीटरचा परिसर हा प्रथम कळला तो १९९९मध्ये. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी पाकिस्तानशी मैत्रीचा हात पुढे करीत होते तेव्हा पाकिस्तानी सैनिकांनी या भागात घुसखोरी केली आणि युद्धाची ठिणगी पडली. तेव्हा आपल्याच देशातला  हा भूभाग आहे आणि तिथंही माणसंच राहतात, हे कोटय़वधी नागरिकांना उमगले. पण ती जाण आज आहे का?

कारगिल जिल्हा हा लेहसकट लडाख लोकसभा मतदारसंघात येतो. तिथे ६ मे रोजी मतदान आहे. त्याचे क्षीण पडसाद या भागांत जाणवतात. डोंगरदऱ्यांच्या कारगिलमध्ये उंच चढणी पार करताना प्रत्येक वळण या भागाच्या एकाकीपणाचाच प्रत्यय देत सरतं. तेव्हा ‘देशभक्ती’च्या उग्र चर्चेत रंगलेले देशवासी या जनतेची आजही किती उपेक्षा करीत आहेत, हे कळतं.

लोकांना ही जाण नसेलही, पण सेनादलांना ती न ठेवणं परवडणारं नसतं. त्यांना या १६ हजार फूट उंचीच्या कारगिलच्या टापूत पाय रोवावेच लागतात आणि त्यावेळी त्यांना मदतीचा हात असतो तो फक्त इथल्या जनतेचा. जी देशभरातल्या जनतेच्या खिजगणतीतही नाही!

कारगिलमध्येच जन्मलेले ७२ वर्षांचे महम्मद अली यांनी भारत आणि पाकिस्तानातलं प्रत्येक युद्ध अगदी जवळून अनुभवलं आहे. ते म्हणतात, ‘‘लष्कराला मदत करणं हा आमच्या रोजगाराचाही मार्ग आहे. पण आता वाटतं की आमच्याही मुलांसाठी शाळा, नोकऱ्या असाव्यात.’’

खारबू गावातील ३५ वर्षांचे शिक्षक महम्मद यासिन सांगतात की, ‘‘दूरदर्शनवर सुरू असलेली देशभक्तीची दंडथोपटी चर्चा, पुलवामा हल्ला, बालाकोटमधील प्रतिहल्ला याचा ऊहापोह कदाचित मोदींना मतांची वाढ करून देईलही, पण आमच्या जगण्यात त्यानं काहीच बदल घडणार नाही, ही विषण्णता उरतेच. आमच्याइतक्या युद्धाच्या झळा कोणी अनुभवल्या आहेत? त्यामुळे जे युद्धाची भाषा करतात त्यांना आधी इथं राहायला लावा. मग त्यांना कळेल की जवानांना केवळ आम्हीच मदत करतो. या जवानांच्या प्राणांचा राजकारणात उपयोग करू नका!’’

कारगिल आणि श्रीनगरमधील जोझिला खिंड हिवाळ्यात सहा महिने बंद असते. त्यामुळे तिथे बोगदा बांधण्याची घोषणा जुनीच आहे. आमची नातवंडेही ती ऐकत मोठी होतील, असा टोला सज्जाद हुसेन या दुसऱ्या शिक्षकानं हाणला.

अर्थात कारगिल हे काश्मीरमध्येच असलं तरी काश्मीरपासून विलग पडलं आहे. घातपाती कारवायांच्या बाबतीत काश्मीर खोऱ्यापेक्षा आम्ही सुखी आहोत. कारण इतक्या उंचावर असल्यानं आमचं जीवन बऱ्याच अंशी शांत आहे, असं द्रासमधील एका गावकऱ्यानं सांगितलं.

युद्धापेक्षा आपल्याच देशातील या दुर्गम भागांत नागरी सोयी का नाहीत, शाळा का नाहीत, तरुणांची परवड का आहे, याची चर्चा व्हायला हवी. ती खरी देशभक्ती ठरेल.

– महम्मद यासिन, शिक्षक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2019 1:26 am

Web Title: ladakh parliamentary kargil residents face multiple problems
Next Stories
1 जनक्षोभानंतर प्रज्ञासिंह यांचे विधान मागे
2 मजबूत सरकारसाठी भाजप-सेनेला मतदान करा- आदित्य ठाकरे
3 मराठय़ांमधील कुटुंबशाही संपवा- प्रकाश आंबेडकर
Just Now!
X