बिहारच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबात सर्वकाही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत. लोकसभा निवडणुकीआधी कौटुंबिक संघर्ष समोर आला आहे. लालू प्रसाद यादव यांचे थोरले सुपूत्र तेज प्रताप यादव यांनी राष्ट्रीय जनता दलाच्या विद्यार्थी शाखेच्या पदाचा राजीनामा दिला आहे. तेज प्रताप यांनी टि्वटरवरुन राजीनाम्याची घोषणा केली. कोण किती पाण्यात आहे ते सर्व मला माहित आहे असे तेज प्रतापने टि्वटमध्ये म्हटले आहे.

तेज प्रताप राजदमध्ये नाराज असल्याचे बोलले जाते. तेज प्रतापचे लहान भाऊ तेजस्वी यादव बरोबर मतभेद समोर आले होते. सध्या विधानसभेचा विरोधी पक्ष नेता असलेल्या तेजस्वीकडे लालू यांचा राजकीय वारसदार म्हणून पाहिले जाते.

राजदकडून लवकरच लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा होणार आहे. त्यापूर्वी दबाव टाकण्याच्या राजकारणाचा भाग म्हणून तेज प्रतापने राजीनामा दिल्याची सूत्रांची माहिती आहे. आपल्या जवळच्या लोकांना उमेदवारी मिळावी यासाठी तेज प्रतापचे प्रयत्न सुरु आहेत. २०१५ साली बिहारमध्ये राजद आणि जनता दल युनायटेडचे सरकार सत्तेवर आल्यानंतर तेजस्वी यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले तर तेज प्रताप यांना आरोग्य मंत्री बनवण्यात आले होते.