काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जीवाला कोणताही धोका नाही असे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. काल उत्तर प्रदेशात अमेठीमध्ये राहुल गांधी यांचा ‘रोड शो’ सुरु असताना कोणीतरी त्यांच्या डोक्यावर हिरव्या रंगाचा लेझर लाईट मारला होता. काँग्रेसने या प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली. काँग्रेसने गृहमंत्री राजनाथ सिंह यांना एक पत्र लिहून त्यात राहुल गांधींच्या सुरक्षेत ढिलाई होत असल्याचे म्हटले होते. तपासामध्ये राहुल गांधींच्या डोक्यावर मारलेला लेझर लाईट कॅमेऱ्याचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हा प्रकार गृहमंत्रालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर विशेष सुरक्षा गटाच्या संचालकांना नेमकं काय घडलं त्याची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले असे गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले. लेझर लाईटची व्हिडिओ क्लिप बारकाईने तपासल्यानंतर ती हिरवी लेझर लाईट अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या फोटोग्राफरच्या मोबाइलची असल्याचे समोर आले. अमेठीमध्ये राहुल गांधी पत्रकारांशी संवाद साधत असताना तो फोटोग्राफर व्हिडिओ शूट करत होता असे एसपीजीच्या संचालकांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला सांगितले.

बुधवारी अमेठीत प्रचारादरम्यान, राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावर अनेकदा हिरव्या रंगाच्या लेझर लाईट मारण्यात आला. ही लेझर लाईट स्नायपर गनची लाईट असावी अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. याचा पुरावा म्हणून काँग्रेसने गृहमंत्रालयाकडे या घटनेचा व्हिडिओ देखील पाठवला.

राहुल गांधींनी बुधवारी आपला लोकसभा मतदारसंघ अमेठीत शक्तीप्रदर्शन करीत दोन तास रोड शो केला त्यानंतर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत बहिण काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा, मेव्हणे रॉबर्ट वढेरा आणि त्यांची दोन मुले रेहान आणि मिराया देखील उपस्थित होते. युपीएच्या अध्यक्षा आणि राहुल गांधींच्या आई सोनिया गांधी रोड शोमध्ये सहभागी नव्हत्या. मात्र, त्यांनी राहुल यांचा अर्ज भरतेवेळी उपस्थिती लावली होती.