बाळासाहेब जवळकर

उमेदवाराबरोबर एक दिवस

युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह; प्रचाराच्या माहितीचे दोन्ही नेत्यांत आदान-प्रदान

बहुचर्चित मावळ लोकसभेच्या दृष्टीने सर्वाधिक लक्षवेधी गोष्ट होती ती खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्यातील टोकाच्या वादाची आणि नंतर मोक्याच्या क्षणी त्यांच्यात झालेल्या मनोमीलनाची. दहा वर्षांपासून एकमेकांचे तोंडही न पाहणाऱ्या या दोन्ही नेत्यांना एकत्र पाहून अनेकांनाआश्चर्य वाटते. जगतापांच्या सांगवी-पिंपळे गुरव बालेकिल्ल्यात ते एकत्रित रीत्या मतदारांना सामोरे गेले. त्याचे सर्वाना भलतेच अप्रूप वाटले.

दुपारी अडीचची वेळ. बाहेर रणरणते ऊन. रस्त्यावर जवळपास शुकशुकाट. मात्र, पिंपळे गुरवमध्ये भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह होता. कारण श्रीरंगअप्पा आणि लक्ष्मणभाऊ एकत्रित प्रचारफेरीत सहभागी झाले होते. वैदूवस्तीत राजू लोखंडे यांच्या निवासस्थानी ते भेटले. सर्वप्रथम दिलजमाई झाली, तेव्हा एकमेकांना मिठी मारून त्यांनी परस्परांना पेढा भरवला होता. इथे मात्र त्यांनी हस्तांदोलनावर काम भागवले. भाजप नगरसेविका चंदा लोखंडे यांनी दोघांचे औक्षण केले. प्रचाराच्या माहितीचे दोघांनी आदान-प्रदान केले. मुख्यमंत्र्यांसह इतर सभांचे नियोजन कसे करायचे यावर चर्चा झाली आणि ते वेगवेगळ्या वाटेला निघून गेले.

या प्रचारानंतर सायंकाळी पिंपळे सौदागर येथील आंबा महोत्सवासाठी बारणे-जगताप पुन्हा एकत्र आले. तेथील शिवम, रोझ आयकॉन यासारख्या मोठय़ा गृहसंकुलांमध्ये त्यांनी संयुक्त बैठका घेतल्या. नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी या बैठकांचे नियोजन केले होते.

तत्पूर्वी, सकाळी नऊपासून भाऊंच्या सांगवी-पिंपळे गुरव बालेकिल्ल्यातून अप्पांची रॅली निघणार होती. त्याचे सर्वानाच कुतूहल होते. सांगवीतील गणपती चौकात युतीचे कार्यकर्ते जमले होते. विजय साने यांची फोनाफोनी सुरू होती. माई ढोरे, शारदा सोनवणे, हर्षल ढोरे, संतोष कांबळे हे भाजप नगरसेवक दाखल झाले. साडेनऊपर्यंत बऱ्यापैकी गर्दी जमली. बारणे ताफ्यासह दाखल होताच फटाके वाजवून कार्यकर्त्यांनी स्वागत केले. जोरजोरात घोषणाबाजी झाली. गणपतीची पूजा करून प्रचारफेरीला सुरुवात झाली.

ढोरेनगर, पवारनगर, हिरकणी, भवानी चौक, अभिनवनगर, पवनानगर, संगमनगर, ममतानगर, प्रियदर्शनीनगर, कुंभारवाडा या मार्गाने गल्लीबोळातून प्रचारफेरी जात होती. जागोजागी कार्यकर्ते स्वागत करत होते, महिला औक्षण करत होत्या. एके ठिकाणी रस्त्याचे काम सुरू होते. मोठी वाहने जाऊ शकत नसल्याने विभागप्रमुख चेतन शिंदे यांच्या दुचाकीवरून बारणे पुढे गेले.

नव्या सांगवीत एके काळचे मित्र बळिराम जाधव यांच्या निवासस्थानी बारणे पोहोचले. त्यानंतर राजेंद्र राजापुरे, रावसाहेब चौगुले, अंबरनाथ कांबळे, सुरेश शिंदे, श्रीनिवास बढे, गौरव टण्णू, भाऊसाहेब जाधव (कानकात्रे), शशिकांत कदम, विश्वास कदम आदींच्या घरी जाऊन गाठीभेठी घेतल्यानंतर बारणे कीर्तिनगर, समर्थनगरला पोहोचले. महालक्ष्मी चौकात फेरी आल्यानंतर प्रकाश शितोळे, क्रांती चौकात मारुतराव साळुंखे, एमके हॉटेल चौकात दीपक ढोरे, अशोक ढोरे यांनी स्वागत केले.

दुपारी दोन वाजून गेले होते. कडकडीत उन्हामुळे कार्यकर्त्यांची दमछाक होत होती. उमेदवार जिथे जात होते तेथे पाणी, चहा, सरबत आदींची विचारणा होत असल्याने तात्पुरता का होईना उन्हाचा त्रास सुसह्य़ होत होता. ऊन उतरल्यानंतर, थेरगावात गणेश मंदिरापासून फेरीला सुरुवात झाली.

दुर्गा कॉलनी, शिव कॉलनी, वाकड रस्ता, मंगलनगर, गुजरनगर, १६ नंबर, जय भवानीनगर, पवारनगर, भोरडेनगर, काळेवाडी, नखातेनगर, बापुजीबुवा मंदिर मार्गे प्रचारफेरी झाली. सायंकाळी काळेवाडीत कोपरा सभा झाली. रात्री व्यापारी बांधवांशी भेटीगाठी झाल्या. उशिरापर्यंत बैठकांचे सत्र सुरू होते.

उद्योगनगरीतील कामगारांना साकडे

टाटा मोटर्सच्या कामगारांची दुपारी तीन वाजता सुटी झाली होती. कंपनीत थेट प्रवेश नसल्याने कंपनीच्या प्रवेशद्वाराबाहेर थांबून उमेदवारांना कामगारांची भेट घ्यावी लागते. त्यानुसार श्रीरंग बारणे यांनी टाटा मोटर्ससह उद्योगनगरीतील समस्त कामगारांना विजयी करण्याचे साकडे घातले. या वेळी त्यांच्यासमवेत आमदार गौतम चाबुकस्वार, भाजपचे नगरसेवक एकनाथ पवार, नामदेव ढाके, माउली थोरात आदी उपस्थित होते.