माजी लष्करी अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्राच्या वृत्तावरून लष्करी अधिकाऱ्यांमध्येच दोन गट असल्याचे समोर येत आहे. माजी लष्करप्रमुख व माजी हवाई दल प्रमुख या दोघांनीही आपण अशा पत्रावर सही केली नसल्याचे सांगितले असून या पत्रप्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे.
माजी लष्करप्रमुख एस एफ रॉड्रिग्ज आणि माजी हवाई दल प्रमुख एनसी सुरी यांनी राष्ट्रपतींना लिहिण्यात आलेल्या त्या पत्रावर आपण सही केली नसल्याचे शुक्रवारी स्पष्ट आहे. “हे पत्र कशाबद्दल आहे याची मला कल्पना नाही. बेचाळिस वर्ष लष्करी अधिकारी म्हणून काम केल्यावर आता बदलणं शक्य नाही. आम्ही नेहमी आधी भारताला प्राधान्य देतो. ही लोकं कोण आहेत, माहित नाही. परंतु हा फेक न्यूजचाच एक भारी प्रकार आहे,” रॉड्रिग्ज म्हणाले.

सैन्याच्या कामगिरीचा राजकीय वापर थांबवा; माजी सैन्य प्रमुखांचे राष्ट्रपतींना पत्र

“हे अॅडमिरल रामदास यांचं पत्र नाही आणि ते कुणी मेजर चौधरी यांनी लिहिलं आहे. ते ही व्हॉट्स अॅप व मेलवर येत आहे,” सुरी यांनी एएनआयला सांगितले. अशा कुठल्याही पत्रासाठी माझी परवानगी घेण्यात आली नव्हती तसेच आमची वक्तव्ये चुकीच्या पद्धतीनं देण्यात आली आहेत असं सुरी म्हणाले.

राजकीय फायद्यासाठी लष्कराचा वापर करण्यात येत असल्याची तक्रार एका पत्राद्वारे माजी लष्करी अधिकाऱ्यांनी केल्याचे मूळ वृत्त होते. १५६ माजी लष्करी अधिकाऱ्यांनी यावर सह्या केल्याचे सांगण्यात आले आहे. लष्कर सीमारेषेवर करत असलेल्या कारवायांचं श्रेय राजकीय पक्ष घेत असल्याकडे लक्ष यात वेधण्यात आले होते. विशेष म्हणजे इंडिया टुडेनं सूत्रांचा हवाला देत असं म्हटलंय की राष्ट्रपकी भवनाकडे असं कुठलंही पत्र आलेलं नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लष्कराचा उल्लेख मोदींची सेना असा केला होता. बालाकोटमध्ये शहीद झालेल्या जवानांना नवमतदारांनी आपलं मत द्यावं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते.

आदित्यनाथांकडून निवडणूक आयोगानं स्पष्टीकरणही मागितलं आहे. राष्ट्रपतींनीच आता यात लक्ष घालावं अशी मागणी या पत्रात करण्यात आली होती. मात्र आता दोन माजी प्रमुखांनीच आपला त्या पत्राशी संबंध नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे लष्करातच दोन गट आहेत की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.