News Flash

विदर्भात ६२ टक्के मतदान

विदर्भातील दहापैकी सात मतदारसंघांत गुरुवारी रणरणत्या उन्हात सरासरी ६२ टक्के मतदान झाले.

उन्हाच्या कडाक्यातही मतदारांनी रांगा लावल्या होत्या.

गडकरी, अहिर, पटोले, माणिकराव ठाकरेंचे भवितव्य मतदानयंत्रांत बंद

नागपूर : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील दहापैकी सात मतदारसंघांत गुरुवारी रणरणत्या उन्हात सरासरी ६२ टक्के मतदान झाले. नागपूरवगळता अन्यत्र मतदानाचे प्रमाण मात्र घटल्याचे प्राथमिक आकडेवारीवरून दिसत आहे. काही ठिकाणी मतदानाची वेळ संपल्यावरही मतदारांच्या रांगा कायम असल्याने तेथील अंतिम आकडेवारी जाहीर झाली नाही. दलित आणि मुस्लीम वस्त्यांमध्ये मतदारांचा उत्साह अधिक होता.

नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर, वर्धा आणि यवतमाळ- वाशीम या सात मतदारसंघात सकाळी सातपासून मतदानाला सुरुवात झाली.  सर्वाधिक उमेदवार नागपूरमध्ये (३०) तर सर्वात कमी उमेदवार गडचिरोलीत (५) आहेत. एकूण १ कोटी ३० लाख ५३ हजार मतदारांसाठी  १४ हजार ९१९ मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था होती.

उन्हाच्या कडाक्यातही मतदारांनी रांगा लावल्या होत्या. दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४६.१३ टक्के मतदान झाले. वर्धा ४३.९ टक्के, रामटेक (अ.जा.) ४४.५० टक्के, नागपूर ४१.२५ टक्के, भंडारा- गोंदिया ४९.०५ टक्के, गडचिरोली- चिमूर (अ.ज.)  ५७ टक्के, चंद्रपूर ४६.३० टक्के आणि यवतमाळ- वाशीम ४३.३५ टक्के मतदान झाले होते. सायंकाळी ५ पर्यंत मतदानाची टक्केवारी ५५.७८ पर्यंत वाढली. मात्र मतदानाची वेळ संपल्यावरही अनेक केंद्राबाहेर मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. सातही मतदारसंघात  अंदाजे सरासरी ६२ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक यंत्रणेकडून सांगण्यात आले.  मतदार यादीत घोळ, ईव्हीएम बंद पडणे अशा स्वरूपाच्या तक्रारी मतदानादरम्यान आल्या.

नागपूरकडे देशाचे लक्ष

नितीन गडकरी नागपूरमधून, हंसराज अहीर चंद्रपूरमधून, तर काँग्रेस महिला शाखेच्या अध्यक्षा चारुलता राव टोकस वर्धा मतदारसंघातून रिंगणात आहेत. नागपूरच्या लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष  लागले आहे. त्यांची लढत काँग्रेसचे नाना पटोले यांच्याशी आहे. एकूण ११६ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले.

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात तीन जवान जखमी

गडचिरोली-नक्षलवाद्यांनी तीन मतदान केंद्रांवर हल्ला केला. एटापल्ली तालुक्यातील परसलगोंदी येथील  हल्ल्यात तीन जवान जखमी झाले. परसलगोंदी केंद्रावरून सी-६० पथकाचे जवान बेस कॅम्पवर परतताना नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून लगेच गोळीबार केला. पोलिसांनीही प्रत्युत्तर दिले. जखमी जवानांना तातडीने हेलिकॉप्टरने नागपूरला हलवले आहे. याच तालुक्यातील टिटोडा गावानजीक नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेली स्फोटके ताब्यात घेतली आहेत. धानोरा तालुक्यातील तुमडीकसा मतदान केंद्रावर नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. मात्र पोलिसांनी प्रत्युत्तर देताच नक्षलवादी पळून गेले. काही ठिकाणची मतदान केंद्रे सुरक्षिततेच्या दृष्टीने अन्यत्र हलवण्यात आली. त्यामुळे मतदाराचा गोंधळ उडाला होता.

पहिल्या टप्प्यात देशभरात मतदारांमध्ये उत्साह

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी गुरुवारी १८ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील ९१ मतदारसंघात उत्साहात मतदान झाले. देशात सर्वाधिक म्हणजे ८१ टक्के मतदान पश्चिम बंगालमध्ये तर सर्वात कमी म्हणजे ५० टक्के मतदान बिहारमध्ये झाले.

निवडणूक आयोगाने गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मात्र सर्व ठिकाणची अंतिम अधिकृत आकडेवारी त्यांना जाहीर करता आलेली नाही.

पश्चिम बंगालमध्ये ४२पैकी कूचबिहार आणि अलिपूरद्वार या दोन जागांसाठी ८१ टक्के मतदान झाले. देशातील हे यावेळच्या पहिल्या टप्प्यातील सर्वाधिक मतदान आहे. त्याखालोखाल मणिपूरमध्ये ७८.२० टक्के, त्रिपुरात ७७.६ टक्के, आसाममध्ये ६८ टक्के,  ओदिशात ६६ टक्के मतदान झाले.

आंध्र प्रदेश आणि तेलंगणमधील सर्वच्या सर्व म्हणजे अनुक्रमे २५ आणि १७ जागांसाठी गुरुवारी एकाच टप्प्यात मतदान झाले. आंध्र प्रदेशात ६६ टक्के मतदान झाले. २०१४च्या तुलनेत हे प्रमाण आठ टक्क्यांनी कमी होते. तर तेलंगणमध्ये ६०.५७ टक्के मतदान झाले. मिझोराममध्येही एकाच टप्प्यात ६० टक्के मतदान झाले. गेल्या वेळेपेक्षा हे प्रमाण एक टक्क्याने कमी आहे.

उत्तर प्रदेशात ६४ टक्के, मेघालयात ६२ टक्के मतदान झाले. लक्षद्वीपमध्येही मतदानात २०१४च्या तुलनेत चांगलीच घट झाली. तेव्हा ८६ टक्के मतदान झाले होते, तर यंदा हे प्रमाण ६५.९ टक्के  होते. अरुणाचलमध्येही मतदानात घटच झाली. २०१४मध्ये तेथे ८६ टक्के मतदान झाले होते, यंदा हे प्रमाण ६६ टक्के होते.

जम्मूत मतदानात वाढ झाली. यंदा ७२.१६ टक्के मतदान झाले. बारामुल्लात ३५.१ टक्के मतदान झाले. गेल्या वेळेपेक्षा हे प्रमाण कमी आहे.

विदर्भातील मतदान टक्केवार

मतदारसंघ                        २०१९              २०१४

१) वर्धा                              ५५.३८              ६४.७९

२) रामटेक                        ५१.७२                ६२.६४

३) नागपूर                         ५८ ते ६०            ५७.१२

४) भंडारा-गोदिया              ६० ते ६५           ७२.३१

५) गडचिरोली-चिमूर        ६१.३३                ७०.०४

६) चंद्रपूर                         ६०                     ६३.२९

७) यवतमाळ -वाशीम    ५३.९७                 ५८.८७

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2019 5:03 am

Web Title: lok sabha election 2019 62 percent polling in vidarbha
Next Stories
1 पारा ४५.२ अंशावर जाऊनही चंद्रपुरात ६५ टक्के मतदान
2 यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात सरासरी ६० टक्के मतदान
3 शेट्टी यांच्या विजयाची साद शरद पवार घालणार
Just Now!
X