काही ठिकाणी सनईचे सूर, एका ठिकाणी दगडफेक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विविध ठिकाणचे प्रतिनिधी, औरंगाबाद</strong>

मराठवाडय़ातील सहा लोकसभा मतदारसंघात सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजे ६२ टक्क्य़ांहून अधिक मतदान झाले. काही किरकोळ प्रकार वगळता सर्वत्र मतदान शांततेत झाले असल्याचे सांगण्यात आले. काही गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता, तर परभणी जिल्ह्य़ातील मानवत तालुक्यातील शेवडी (जहांगीर) येथे मतदान केंद्राच्या हद्दीत दुकान बंद करण्याच्या कारणावरून गावकरी व पोलीस  यांच्यातच वाद झाला. त्यानंतर दगडफेकीचाही प्रकार घडला. काही मतदान केंद्रांवर अगदी सनईचे सूर लावून आणि फुलांनी स्वागत करण्यात आले आणि लोकशाहीचा उत्सव मराठवाडय़ात उत्साहात पार पडला.

लातूरमध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५६.६८ टक्के मतदान झाले. अहमदपूर तालुक्यातील सुनेगाव शेंद्री येथील ग्रामस्थांनी रस्त्याच्या मागणीसाठी मतदानावर बहिष्कार टाकल्याने दुपारी चार वाजेपर्यंत एकही मतदान झाले नव्हते. भाजपाचे उमेदवार सुधाकर शृंगारे, काँग्रेसचे उमेदवार मच्छींद्र कामत व वंचित विकास आघाडीचे उमेदवार राम गारकर यांनी आपापल्या गावी मतदानाचा हक्क बजावला. बाभळगाव येथे आमदार अमित देशमुख, वैशालीताई देशमुख, दिलीपराव देशमुख असे कुटुंबातील सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी औराद शहाजनी येथे सपत्नीक मतदान केले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष निवडणूक लढवत असणाऱ्या नांदेड लोकसभा मतदारसंघात गुरुवारी दोन हजारांहून अधिक केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. काही ठिकाणी मतदान यंत्रात झालेल्या तांत्रिक बिघाडाचे प्रकार वगळता सर्व काही सुरळीतपणे सुरू असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी सांगितले. सायंकाळी पाचपर्यंत ६० टक्के मतदानाची नोंद झाली. हिंगोलीमध्ये  ग्रामीण भागातील किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. गेल्या निवडणुकीत ६६.२५  टक्के मतदान झाले होते. या वेळी पाच वाजेपर्यंत ५६. ३३ टक्के मतदान झाले. निवडणूक मदानात असलेल्या २८ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले.

परभणीत उन्हाचा कडाका वाढलेला असतानाही अंदाजे ६४ टक्के एवढे मतदान झाले. प्रशासनाने सायंकाळी सहापर्यंत ६२.६४ टक्के मतदान झाल्याचे कळवले होते. यात एक ते दीड टक्क्याची वाढ अपेक्षित आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही ६४.२० टक्के मतदान झाले होते. परभणी जिल्ह्य़ातील मानवत तालुक्यातील शेवडी (जहांगीर) येथे मतदान केंद्राच्या हद्दीत दुकान बंद करण्याच्या कारणावरून झालेल्या दगडफेकीत पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब डोंगरे यांच्यासह खासगी वाहनचालक जखमी झाला. याप्रकरणी बोरी पोलीस ठाण्यात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल  करण्यात आला.

उस्मानाबादमध्ये अंदाजे ६५ टक्क्यांहून अधिक मतदान यंदा नोंदविले जाण्याची शक्यता आहे. खासदार रवींद्र गायकवाड यांच्यासोबत ओम राजे गटाच्या समर्थकांनी केलेली धक्काबुक्की वगळता मतदारसंघात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. एक-दोन ठिकाणी मतदान यंत्रात सकाळच्या टप्प्यात बिघाड झाले होते. त्यामुळे मतदान प्रक्रिया सुरू होण्यास विलंब झाला.

राजकीय पातळीवर प्रचंड संवेदनशील बीड मतदारसंघात गुरुवारी किरकोळ प्रकार वगळता सर्वत्र शांततेत मतदान झाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५८ टक्के मतदान झाले असून उर्वरित वेळेत सर्वसाधारणपणे एकूण ६५ टक्के मतदान होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. भाजप व राष्ट्रवादीने प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत ३६ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून आता कोणाला किती कोणत्या भागात मतदान पडले याची आकडेमोड सुरू झाली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha election 2019 62 percent voting turnout in marathwada
First published on: 19-04-2019 at 01:31 IST